नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून शहर विकासात योगदान देणार्या स्थानिक व भूमिपुत्र ठेकेदारांनी अधिक नफ्याची अपेक्षा न ठेवता मनपाची नागरी विकास कामे करताना हजारो अवलंबितांना रोजगार दिले आहेत, मात्र या ठेकेदारांकडे केवळ भांडवलदार अथवा व्यवसायिक म्हणून काही अधिकारी पाहत आहेत. याउलट याच अधिकार्यांनी स्वतःचे घर भरण्यासाठी शहराबाहेरील मर्जीतील घटकांना टेंडर देऊन व प्रसंगी भागीदारी तत्वावर मोठा गोरखधंदा मांडलेला आहे. या काही प्रतिनियुक्ती अधिकार्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचे माजी विरोधी नेते दशरथ भगत यांनी सांगितले आहे.
स्थानिक व भूमिपुत्र ठेकेदारावर यांच्याकडे असलेली यांत्रिक व साधन सामुग्री बंद असल्यामुळे त्यांचे बँकेचे हप्ते न भरणे व त्यांच्याकडील कुशल, तंत्रज्ञ, कार्यालयीन तसेच प्रामुख्याने मजूर वर्गाला उपाशीपोटी ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. नवी मुंबई पालिकेच्या वातानुकूलित इमारतीत बसलेल्या प्रतिनियुक्तीवर आलेल्या काही अधिकार्यांवर असलेल्या वरिष्ठांच्या वरदहस्तामुळे शहरातील करदात्या सर्वसामान्य नागरिकांना व व्यावसायिक दुकानदारांनी कर रूपाने दिलेल्या महलूलाची अक्षरशः नागरी विकासकामांच्या नावाखाली दर्जाहीन कामे करून मनपाच्या तिजोरीतील जनतेच्या पैशांची विल्हेवाट लावली जात असल्याचे दिसून येत आहे. याविरोधात आता महापालिकेचे पिढीत ठेकेदार व उपजीविका धारकही काही प्रतिनियुक्ती अधिकार्यांच्या विरोधात मैदानात उतरले असून प्रथम सनदशीर मार्गाने आंदोलन तीव्र करणार असल्याचे भगत यांनी सांगितले आहे.
या वेळी बोलताना दशरथ भगत यांनी सांगितले की, नवी मुंबई शहराशी व स्थानिक नागरिकांशी कोणत्याही प्रकारची बांधिलकी नसलेल्या व काही काळासाठी प्रतिनियुक्तीवर शहरात आलेल्या भ्रष्ट व षड्यंत्री अधिकार्यांच्या मानसिकतेमुळे शहरातील लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक घटक, प्रशासकीय घटक, पालिकेतील कायम अधिकारी व कर्मचारी वर्ग हे हतबल झाले आहेत. विशिष्ट प्रकारच्या अनावश्यक व अशक्य अटींचा अंतर्भाव करून विविध कामांच्या निविदा बनवायच्या ज्याचा प्रत्यक्ष कामाशी काहीही संबन्ध नसतो, अशा प्रकारच्या षडयंत्री डावामुळे आपल्याच मर्जीतील शहराबाहेरील ठेकेदारांना व स्वतःला भागीदारीत काम मिळेल याची तजवीज या अधिकार्यांकडून काळजीपूर्वक घेतली जात आहे.
या कारभाराच्या विरोधात डोळ्यांदेखत होत असलेली लूट व अनेकांचे रोजगार उधळून लावणार्या घटकांच्या विरोधात नवी मुंबईतील स्थानिक व भूमिपुत्र ठेकेदारांच्या असोसिएशनच्या वतीने माजी नगरसेवक विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या समनव्यातुन नुकत्याच झालेल्यार नवी मुंबई बचाव परिषदेत माजी मंत्री व आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत आर्जव विनंतीपर विविध 46 मागण्या केल्या आहेत.
दरम्यान, परिषदेच्या माध्यमातून नवी मुंबईतील स्थानिक व भूमिपुत्र ठेकेदार एकवटले असून यांच्या संघर्षास नवी मुंबईतील सर्वपक्षीय माजी लोकप्रतिनिधी, महापालिकेतील कायम सेवेतील त्रस्त अधिकारी आणि जागरूक नागरिक जाहीर पाठिंबा देण्यासाठी सरसावले असून हा लढा आता तीव्र होणार आहे.
Check Also
अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात 15 दिवसांत माहिती द्या
मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश मुंबई ः रामप्रहर वृत्त भाताण येथील अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात …