नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
राजस्थानात सत्ताधारी काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धक्का बसला आहे. चार टप्प्यांत झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप बाजी मारेल, असे चित्र दिसत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिकरं जिल्ह्यात हिंसाचाराच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भाजपने पंचायत समितीच्या 1835 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला 1718 जागा जिंकता आल्या. 4050 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. 222 पंचायत समित्यांमध्ये एकूण 4371 जागा आहेत. जिल्हा परिषदेतही अशीच स्थिती आहे. जिल्हा परिषदेत 580 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपने 312, तर काँग्रेसचे उमेदवार 239 जागांवर विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेत एकूण 636 जागा आहेत. ग्रामीण भागात पकड असल्याचा दावा करणार्या काँग्रेससाठी हा मोठा झटका आहे.पंचायत समितीत 422 अपक्ष आणि 56 राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत. सीपीएमनेसुद्धा 16 जागा जिंकल्या आहेत. पंचायत समिती व जिल्हा परिषदेत आता अपक्षांची भूमिका महत्त्वाची राहील. हा निकाल म्हणजे गरीब, शेतकरी आणि मजुरांचा मोदी सरकारवरील विश्वास आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.