पनवेल ः वार्ताहर
भारतीय मानव विकास ट्रस्ट संचालित बौद्धिक अक्षम मुलांची विशेष शाळा नवीन पनवेल येथे दरवर्षी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो, पण या वर्षी कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रेया जाधव यांनी कार्यक्रमाचे सातत्य राखण्यासाठी तसेच मुलांचा व पालकांचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टीने वेगळ्या प्रकारे ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
त्यात पहिल्या दिवशी विद्यार्थी व पालकांना ऑनलाइन गूगल मिटवरून शुभेच्छा देत संवाद साधण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून पालक-विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मुलांचा उत्साह वाढावा तसेच त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी घरी जाऊन बक्षिसे देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तज्ज्ञांचे व्हिडीओ पालकांना पाठविण्यात आले. यामध्ये आहारतज्ज्ञ, अपोलो हॉस्पिटल (क्लीनलीनेस) रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्राणायाम व योगा असे माहितीपर विषय समाविष्ट होते. तसेच शाळेत सुरू केलेले शीघ्र निदान व उपचार केंद्रविषयक जनजागृतीच्या दृष्टीने माहितीपत्रक जिल्हा परिषदेच्या शाळांना पाठविले. या वेळी पनवेल परिसरातील क्लिनिकमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला.