Friday , September 22 2023

रायगडातही जलधारा बरसल्या

पिकांच्या नुकसानीची भीती; शेतकरी चिंतेत

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागांत शुक्रवारी (दि. 10) पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसून नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. मुरूड, नागोठणे यांसारख्या भागात गुरुवारीच पावसाने बरसात केली होती, तर शुक्रवारी पहाटे जवळपास सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसला.
या अवकाळी पावसाचा प्रामुख्याने आंबा पिकावर तसेच कडधान्यांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाळ्यात प्रमुख भाताचे पीक घेतल्यानंतर मोसमाच्या दुसर्‍या टप्यात शेतकरी वाल, चवळी, मूग, मटकी, हरभरा तसेच सफेद कांदा अशा पिकांचे उत्पादन घेत असतात. हिवाळ्याच्या थंडीत ही पिके घेतली जातात. दवाच्या पडणार्‍या पाण्यावर ती होत असतात. कडधान्य पिकांना पाऊस चालत नाही, मात्र पाऊस पडल्याने या पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर कलिंगडच्या लागवडीसाठी हा पाऊस अपायकारक आहे.
कोकणातील सर्वाधिक महत्त्वाचे पीक म्हणजे आंबा आहे. अवकाळी पावसामुळे आंबा पिकालासुद्धा धोका निर्माण झाला आहे. एकतर थंडी कमी पडत असताना त्यातच पाऊस पडल्याने आंबा उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. आधीच विविध नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त असलेल्या शेतकरी, बागायतदारांवर अवकाळी पावसामुळे नवे संकट ओढवले आहे.

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply