कळंबोली : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभर टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. या दरम्यान सर्व उद्योग बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेले कामगार, निराधार, गोरगरिबांचे हाल होवू नये. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवु म्हणून केंद्र, राज्य शासनामार्फत गोरगरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे, मात्र त्या रास्त धान्याचे वाटपच पनवेल तहसिल कार्यालयाकडून करण्यात येत नसल्याने गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. राज्यात सुद्धा विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शासनाने देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले होते. परिणामी सर्व व्यापार, उद्योग बंद होते. त्यामुळे कामगार, गोरगरिबांची उपासमार होत आहे. या परिस्थितीपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत गोरगरिबांना मोफत व सवलतीच्या दरात धान्याचे वाटप करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परंतु पनवेल तहसिलदारांकडून ठेकेदाराला रास्तधान्य दुकानदाराना धान्य वितरण करण्याचा ठेका दिला आहे. या ठेकेदारानुसार पनवेल तहसिल पुरवठा कार्यालयाचे काम चालत असल्याने गेली काही दिवसांपासून रास्तधान्य दुकानदाराना धान्यचा पुरवठाच करण्यात आला नाही. तालुक्यातील कामगार, गोरगरिब आज धान्य मिळेल या आशेपोटी काही दिवसांपासून रास्तधान्य दुकानाची दारे झिजवत आहेत. पण त्यांना खाली हात परतावे लागत असल्याने त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. याबाबत रास्तधान्य दुकानदार दुर्लक्ष करीत आहेत. स्वस्त धान्य दुकानातील कारभार सर्वश्रुत आहे. बीपीएल, अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील नागरिकांनाबरोबर सर्वांना आतापर्यंत स्वस्त व मोफत धान्य मिळत होते, परंतु सध्या पुरवठा विभागाकडून धान्याचे वितरण करण्यात आले नसल्याने धान्याचे वाटप करण्यात येत नाही. दररोज धान्य घेण्यासाठी येणारे ग्राहक खाली हात परतत आहेत. याबाबत प्रस्तुत प्रतिनिधींनी तहसील पुरवठा कार्यालयाशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता समोरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
आधार लिंक नसलेल्यांनासुद्धा रेशनवर धान्य देण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर
आधार लिंक नसलेल्यांना सुद्धा रेशनवर धान्य देण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे स्वाभिमानी युथ आरपीआय जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी शासनाकडे दिले असून याबाबत त्यांनी पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली आहे की, ज्यांचे रेशनकार्ड आधार लिंक नाहीत अशांना रेशन दुकानदार धान्य देत नाहीत तरी त्यांना कृपया रेशनवर धान्य देण्यात यावे. वडघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक रेशनकार्ड धारकांचे रेशनकार्ड हे आधारकार्ड लिंक केलेले नाही. त्याचप्रमाणे लॉकडाऊनमुळे गेले 75 दिवस अनेक कमावती माणसे बेरोजगार झालेली आहेत. त्यांना नव्याने काम मिळणे किंवा नोकरी मिळणे दुरापास्त झालेले आहे. अनेक परिवार आर्थिक मंदिची झळ सोसत आहेत. अशा वेळेला दोन वेळच्या जेवणाची सोय ही फक्त रेशन दुकानामधून मिळणार्या धान्यातूनच होवू शकते. परंतु रेशनकार्ड धारकांचे रेशनकार्ड आधार लिंक नाही त्यामुळे त्यांना धान्य मिळत नाही. यातूनच वादविवाद होत आहेत. तरी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून शासनाने अशा नागरिकांसाठी धान्य पुरवठा सुरू करावा, अशी मागणी महेश साळुंखे यांनी केली आहे.