Monday , October 2 2023
Breaking News

वॉटर स्पोर्ट्स बंद; स्थानिक बेरोजगार

मुरुड : प्रतिनिधी

शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्रदर्शित न झाल्यामुळे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने सुरु असलेले वॉटर स्पोर्टस अचानक  बंद केले आहेत. त्यामुळे रोजगारावर गदा आलेले स्थानिक संताप व्यक्त करीत आहेत, तर पर्यटकसुध्दा नाराजी व्यक्त करीत आहेत.

रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी एकूण 150पेक्षा जास्त वॉटर स्पोर्टस अस्तित्वात आहेत. यामध्ये बनाना रायडींग, बोटीने समुद्र विहार, स्पीड बोटीच्या सहाय्याने पॅरासिलींग करणे आदी खेळांचा समावेश आहे. मेरिटाइम बोर्डाने मुरुड तालुक्यातील काशीद, मुरुड तर अलिबाग तालुक्यातील किहीम, अलिबाग, नागाव येथील स्थानिक लोकांचे वॉटर स्पोर्टस अचानक बंद केले आहेत. त्यामुळे रोजगार बुडाल्याने स्थानिकांत संताप व्यक्त केला जात आहे.    

कोरोनामुळे सात महिन्यापेक्षा जास्त काळ वॉटर स्पोर्टस बंद होते. त्यामुळे त्यावर अवलंबून असणारे घरात बसून होते. आता वॉटर स्पोर्टस अचानक  बंद झाल्याने जगायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. यातील अनेक लोकांनी बँकेचे कर्ज घेऊन स्पीडबोटी विकत घेतल्या आहेत, त्यांच्यासमोर बँकेच्या हप्ते कसे भरावयाचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बेरोजगारीमुळे स्थानिक लोक संतापले असून, ते वॉटर स्पोर्टस सुरु करण्याची मागणी करीत आहेत.

वॉटर स्पोर्टससाठी स्पीडबोट घ्यावी लागते. तीची   किंमत 20 ते 25 लाख रुपये असते. त्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले आहे. वॉटर स्पोर्टस बंद केल्याने कर्जाची परतफेड कशी करावयाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच एका बोटीवर सात युवक काम करतात. ते कामगारसुद्धा बेकार झाले आहेत.

-सागर चौलकर, मालक, विहान वॉटर स्पोर्ट, मुरूड

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply