नागोठणे : प्रतिनिधी
सत्याग्रह कसा असतो व तो कसा करायचा असतो, हे येथील जनतेला शिकवून दिले आहे. 36 वर्षांपूर्वी सरकारी कंपनीशी केलेला करार आता रिलायन्सला सुद्धा लागूच होत असून कोणताही पंगा न घेता तसेच कंपनी बंद न पाडता आंदोलन चालूच राहणार आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशी स्पष्टोक्ती अॅड. बी. जी. कोळसे पाटील यांनी विशेष मुलाखतीत दिली.
लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने रिलायन्सचे विरोधात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चालू असून आंदोलनाचा रविवारी सतरावा दिवस होता. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बी. जी. कोळसे पाटील यांनी रविवारी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी त्यावेळी संबंधित प्रतिनिधीशी विशेष मुलाखत दिली. एखाद्या ठिकाणी आंदोलन केले की, मागण्या मान्य झाल्याशिवाय कधीही मागे हटत नसल्याचे कल्याणी तसेच इतर कंपन्यांचे दाखले स्पष्ट केले. नागोठण्याचे हे आंदोलन म्हणजे आरपारची लढाईच आहे. कितीही महिने झाले तरी, प्रश्न निकाली निघाल्याशिवाय आंदोलनकर्ते येथून उठणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
17 दिवसांत एकही सरकारी अधिकारी येथे आला नसल्याबद्दल खंत व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांना आजच खरमरीत असे पत्र पाठवले आहे. रिलायन्सचे आंदोलनाबाबत लोकप्रतिनिधी म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल त्यांना मी विचारला असून आमच्या या प्रश्नाबाबत आपण लक्ष द्यावे, अशी मागणी पत्रात केली आहे. सोमवारपासून मुंबईच्या आझाद मैदानात बचत गटांच्या महिलांचे आंदोलन चालू होत असून स्वतः त्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मी किंवा संघटनेचा इतर कोणताही पदाधिकारी कोणाचा मिंधा नसून आमचे मुख्य संघटक राजेंद्र गायकवाड यांनी मागील दोन वर्षांपासून येथे मेहनत आहेत. त्यामुळेच आंदोलनाला एक वेगळी धार आली असल्याचे अॅड. बी. जी. कोळसे पाटील यांनी स्पष्ट करताना प्रकल्पग्रस्तांचा निश्चितच विजय होणार असल्याचे निक्षून सांगितले.