कर्जत : बातमीदार
कोरोनाच्या काळात बंद केलेली एसटीची कळंब-वारे ते नेरळ बससेवा पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
कोरोनाच्या काळात सतर्कता म्हणून एसटीची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती, मात्र आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कर्जत तालुक्यातील कळंब परिसरामधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नेरळ तसेच पोशीर येथे जावे लागते. लॉकडाऊननंतर शासनाने 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत शाळा-कॉलेजेस सुरू केले आहेत. एसटी बससेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खासगी प्रवासी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्याचा फायदा कळंब-नेरळदरम्यान प्रवासी वाहतूक करणारे खासगी टॅक्सी-रिक्षावाले घेत असून प्रवाशांकडून प्रतिसीट 40 ते 50 रुपये भाडे घेत आहेत. त्यामुळे दररोजचा प्रवास खर्च परवडत नसल्याने काही पालक आपल्या पाल्यास शाळा-कॉलेजमध्ये पाठवत नसल्याचे दिसून येत आहे.
या भागात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने राहत असून उदरनिर्वाहासाठी ते भाजीपाला पिकवतात. त्यांना भाजीपाला घेऊन नेरळ येथे जावे लागते, मात्र एसटी सेवा बंद असल्याने त्यांनाही प्रवासासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. याशिवाय रोज कामानिमित्त प्रवास करणार्यांची संख्याही जास्त आहे. या सर्वांना एसटी सेवा बंद असल्याचा फटका बसत आहे. शासनाने निदान सकाळी आणि संध्याकाळी नेरळ-वारे-कळंब एसटी बस फेर्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
आमच्या कळंब भागात एसटीची सेवा बंद असल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणार्यांचे फावले आहे. कळंब ते नेरळपर्यंतच्या 12 किलोमीटर अंतरासाठी माणसी 40 ते 50 रुपये घेत असल्याने सर्वसामान्यांना ते परवडत नाही. त्यात शाळा-कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसत आहे. प्रशासनाने किमान सकाळ-सायंकाळी बसफेर्या सुरू कराव्यात.
-अॅड. शाकीब पानसरे, ग्रामस्थ, कळंब, ता. कर्जत
आमच्या कळंब विभागातील विद्यार्थ्यांना शाळा -कॉलेजसाठी नेरळ व पोशीर येथे जावे लागते, मात्र एसटीची बससेवा बंद असल्याने त्यांना खासगी वाहनाने जावे लागते. ते परवडत नसल्याने काही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत. जर बससेवा पूर्ववत झाली, तर या भागातील विद्यार्थ्यांना सोयीचे होईल.
-कृष्णा बदे, माजी सरपंच, कळंब, ता. कर्जत