फडणवीसांनी धरले राज्य सरकारला धारेवर
मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (दि. 15) सलग दुसर्या व शेवटच्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला विविध विषयांवर धारेवर धरले. आरक्षण, शेतकर्यांचे प्रश्न, वाढीव वीज बिले, कोरोनाचा संसर्ग, कंगना रणौत व अर्णब गोस्वामींवरून झालेले वाद आदी मुद्द्यांवरून फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारचा समाचार घेत कायद्याने राज्य चालवा, असा सल्ला दिला.
सत्ता डोक्यात जाता कामा नये!
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंगाच्या प्रस्तावाचा मुद्दा मांडत अभिनेत्री कंगना रणौत आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचा उल्लेख करून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. कंगना आणि अर्णब यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, पण सोशल मीडियावर या सरकारविरोधात एकही वाक्य लिहिले तर तुम्हाला अटक झाल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती आहे. सत्ता डोक्यात जाता कामा नये, अशा शब्दांत फडणवीस यांनी या वेळी सरकारच्या कारभारावर आसूड ओढले.
अर्णब गोस्वामी किंवा कंगना रणौत असतील आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी रेकॉर्डवर सांगतोय की आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योग्यच केला पाहिजे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेखही योग्यच झाला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षनेत्याचा उल्लेख कसाही केला तरी तो सक्षम आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
कृषी कायद्यांना बेगडी विरोध
सुधारित कृषी कायद्यांना महाराष्ट्र सरकार विरोध करीत आहे, मात्र हा विरोध बेगडी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातच हे कायदे झाले. महाराष्ट्रात हे कायदे आताही लागू आहेत. इथे हे कायदे लागू असताना केंद्राच्या कायद्यांना राजकीय विरोधासाठी विरोध केला जात आहे, परंतु नवे कायदे शेतकर्यांच्या हितासाठीच आहेत.
राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला
गेल्या काही महिन्यांत कोरोना आणि वादळी परिस्थितीने महाराष्ट्रातील शेतकर्यांना झोडपून काढले. संपूर्ण राज्यात वादळी पावसामुळे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौरा केला होता. मुख्यमंत्री ठाकरे सोलापुरात दाखल झाले तेव्हा त्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिलेल्या धनादेशांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा सोलापूरला पाहणी दौर्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या हस्ते तीन हजार रुपयांच्या चेकचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्रिपदी असलेली व्यक्ती जेव्हा अशा ठिकाणी जाते तेव्हा त्यांच्या हस्ते किती मदत द्यावी याचा काहीतरी राजशिष्टाचार ठरवण्यात आला पाहिजे. कारण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अवघ्या तीन-तीन हजारांचे चेक नुकसानभरपाई म्हणून देणे योग्य नाही. अशा प्रकारची मदत देणे म्हणजे ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ याच म्हणीप्रमाणे आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लगावला.
वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्षांचे फडणवीसांना समर्थन
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीज बिलांचा मुद्दा मांडत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. सरकारने वीज बिलांसंबंधी घोषणा करून नंतर मात्र जनतेची फसवणूक केली असल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी केला आहे. त्यावरून सत्ताधार्यांकडून गोंधळ सुरू झाला असता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांचे समर्थन करीत विरोधी पक्षनेते योग्य भूमिका मांडत असल्याचे सांगितले.
कोरोना भ्रष्टाचारावरून ताशेरे
राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळातील राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. या काळात झालेल्या भ्रष्टाचारावर एक पुस्तिकाच प्रकाशित करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला.