पेण : प्रतिनिधी
रायगड जिल्हा शालेय विद्यार्थी वाहतूक वाहन चालक मालक संघ या संघटने तर्फे संघटनेचे संस्थापक हरीश बेकावडे व अध्यक्ष बा. म. बिराजदार यांच्या उपस्थितीत पेण तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करुन तहसीलदार अरुणा जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. रायगड जिल्ह्यात विद्यार्थी वाहतूक संघटनेचे सुमारे 700 सभासद असून वाहन संख्या एक हजारांच्या पुढे आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थी वाहतूक व्यवसाय अद्यापही सुरू होऊ शकला नाही. परिणामी विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या चालक व मालकांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. वाहन उभे असतानाही विविध प्रकारचा कर भरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी संघटने तर्फे पेण तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यात संघटनेचे पदाधिकारी, चालक आणि मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सार्वजनिक परिवहन सेवांवर वाढत चाललेला ताण आणि कमी पडणारी वाहनांची संख्या लक्षात घेता, परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत प्रवासी सेवेसाठी परिवहन वाहतुकीत शालेय बसेसचा समावेश करून घ्यावा, स्कूलबस वाहनांची वयोमर्यादा तीन वर्षानी वाढवून 18 वर्ष करावी अशा मागण्या संघटनेचे संस्थापक हरीश बेकावडे यांनी या वेळी केल्या.