Breaking News

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था
दुसर्‍या दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटी सामन्यावर वर्चस्व निर्माण करणार्‍या भारतीय संघाचे आव्हान शनिवारी (दि. 19) तिसर्‍या दिवशी अवघ्या काही तासांमध्ये नाट्यमयरित्या संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाने भारतावर आठ गडी राखून मात करीत चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक मार्‍यापुढे भारताचा दुसरा डाव अवघ्या 36 धावांत संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने आपली निच्चांकी धावसंख्याही यादरम्यान नोंदवली. विजयासाठी मिळालेले 90 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केलं. मॅथ्यू वेड आणि बर्न्स यांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी करीत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. जो बर्न्सने नाबाद 51 धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
दुसर्‍या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघाने 1 बाद 9 अशी मजल मारली होती. दिवसाअखेरीस 62 धावांची आघाडी मिळवलेल्या भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. नाईट वॉचमन जसप्रीत बुमराहला कमिन्सने झटपट माघारी धाडले. यानंतर भारतीय संघाला लागलेली गळती थांबलीच नाही. हनुमा विहारी आणि उमेश यादव यांनी अखेरीस झुंज देण्याचा प्रयत्न केला, तर मोहम्मद शमीला दुखापत झाल्यामुळे तो फलंदाजी करू शकला नाही. यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 90 धावांचे सोपे आव्हान मिळाले होते.
द्रविडला प्रशिक्षक नेमा!
ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात भारतीय संघाची दाणादाण उडाली. पहिल्या डावात 244 धावांपर्यंत मजल मारणारे भारताचे धुरंधर दुसर्‍या डावात पूर्णपणे अपयशी ठरले आणि टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या 36 या निचांकी धावसंख्येत आटोपला. या लाजीरवाण्या कामगिरीनंतर सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीका केली आहे. काहींनी शास्त्री यांची हकालपट्टी करीत राहुल द्रविडला संधी देण्याची मागणी केली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply