Breaking News

रायगडकरांसाठी 2020 ठरले नैसर्गिक आपत्तींचे वर्ष

एक हजार 291 कोटी 46 लाखांचे नुकसान

अलिबाग ः प्रकाश सोनवडेकर
रायगडकरांसाठी 2020 हे वर्ष नैसर्गिक आपत्तीचे वर्ष ठरले आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांत 29 जणांना प्राण गमवावे लागले. दोन लाख घरांची पडझड झाली. 38 हजार 715 सार्वजनिक मालमत्तांची हानी झाले, तर एक हजार 291 कोटी 46 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकले. अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड तालुक्यासह रोहा, म्हसळा, माणगाव, तळा, पेण तालुक्यांना वादळाचा जोरदार तडाखा बसला. वादळाची सूचना मिळाल्याने जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. त्यामुळे मोठी जिवीतहानी टाळली. असे असले तरी वादळामुळे अपरिमित वित्तहानी झाली.
निसर्ग चक्रीवादळात सात जणांचा बळी गेला. दोन लाख घरांची पडझड झाली. 16 हजार हेक्टर बागायती नष्ट झाल्या. वीजपुरवठा खंडीत झाला. त्यामुळे अर्धा रायगड जिल्हा अनेक दिवस अंधारात होता. सार्वजनिक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले. या संकटातून रायगडकर  सावरत असतानाच ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात  अतिवृष्टी झाली. त्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले पीक पावसाने हिरावून नेले.
जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे 29 जणांचा मृत्यू झाला. यात तीन जण पुरात वाहून गेले, तर वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. यापैकी सात जणांचे मदत वाटप अद्यापही प्रलंबित आहे. नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील 247 दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला. यात 153 मोठ्या आणि 94 लहान दुधाळ जनावरांचा समावेश होता. याशिवाय ओढकाम करणार्‍या 101 जनावरांचा अतिवृष्टीत मृत्यू झाला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply