Breaking News

रायगडात जोरदार पर्जन्यवृष्टी

पाणी शिरले, दरडी कोसळल्या; जनजीवन विस्कळीत

मुरूड ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, मुरूडसह अन्य काही ठिकाणी पाणी शिरले. त्याचबरोबर दरड कोसळणे, भिंत पडणे अशा पझडझीच्या घटना घडून वित्तहानी झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी (दि. 12) संपलेल्या 24 तासांत सरासरी 80.76 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुरूड तालुक्यात रविवारपासून पाऊस पडत होता. रात्रभरही मुसळधार पाऊस पडल्याने शहरातील लक्ष्मीखार, शेगवाडा आदी भागांतील घरात पाणी घुसले.  ग्रामीण भागातही मजगाव, नांदगाव, वाळवंट, उसर्ली, बोर्लीनाका आदाड, उसरोली, खारीकवाडा जलमय झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे अन्नधान्य व मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
राजपुरी या ठिकाणी मातीचा ढीग खाली येऊन काही घरांचे नुकसान झाले आहे. मुरूड हा डोंगराळ तालुका असल्याने काही रस्त्यांवरही दरडी व मातीचा ढीग पडला आहे. पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता. या पावसात रोहा-मुरूड रस्त्यावर केळघर आदिवासी वाडी येथे दरड कोसळल्याने तेथील वाहतूक ठप्प झाली. याशिवाय अलिबाग, महाड, माणगाव, श्रीवर्धन येथे पाणी शिरल्याच्या व पडझडीच्या घटना घडल्या आहेत.
विहूर येथील पूलही खचला
काशीद येथील पूल कोसळल्याने अलिबाग-मुरूड वाहतूक बंद झाली आहे. या दुर्घटनेत एका जणाचा मृत्यू झाला असून दोन महिला व एक लहान मुलगा असे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले. यानंतर सुपेगावमार्गे वाहतूक वळवण्यात आली होती, पण विहूर येथील छोटा पूल खचल्याने प्रशासनाने अधिक धोका नको म्हणून मुरूड-सुपेगाव रस्त्यावरील वाहतूकही बंद ठेवली आहे. मुरूडला येण्यासाठी दुसरा पर्याय केळघरमार्गे-रोहा होता, मात्र या रस्त्यावरसुद्धा दरड व मातीचा ढीग कोसळल्याने हा मार्गदेखील बंद आहे. आता मुरूडला येण्यासाठी एकमेव भालगाव मार्गच उरला आहे, परंतु यासाठी प्रथम रोहा गाठावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय.

Check Also

केंद्रीय मंत्री रामदास आठवले रविवारी कामोठ्यात

महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ सभा कामोठे : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी …

Leave a Reply