Breaking News

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला

मराठा क्रांती मोर्चाची घणाघाती टीका  

पुणे ः मराठा समाजाच्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध मराठा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर मराठा समाजातील दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी ठाकरे सरकारने ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा निर्णय घेतला, परंतु यावरून महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची घणाघाती टीका मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्च्याच्या पदाधिकार्‍यांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली. पत्रकार परिषदेला मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, राष्ट्र सेवा समूहाचे राहुल पोकळे, संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, मराठा महासंघाचे अनिल मारणे, अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या शशिकला भोसेकर, श्रीमंत कोकाटे, उत्तम कामठे आदी उपस्थित होते.
मराठा समाजाने आम्हाला ’ईडब्ल्यूएस’ आरक्षण द्या, अशी कधीही मागणी केली नव्हती, पण सरकारने हे आरक्षण देऊन आमच्यासाठी व्यापक स्वरूपात व अधिकृतरीत्या मिळणार्‍या आरक्षणाचाच खून करण्याचे काम केले आहे. याद्वारे संपूर्ण मराठा समाजाची फसवणूक आघाडी सरकारने केली आहे. यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणार्‍या 42 तरुणांचा अपमान आघाडी सरकारने केला, अशी संतप्त भूमिका मराठा समाजाच्या नेत्यांनी पुण्यात मांडली.  
मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्य मागास गटातून लाभ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आरक्षणापासून दूर लोटणारा असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे-पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजाचा या निर्णयाला विरोध असून शासनाने आपला निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, अशा इशाराही मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून या वेळी देण्यात आला.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply