Friday , March 24 2023
Breaking News

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून आढावा

पनवेल ः प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ठाणे परिक्षेत्रासह नवी मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत ठाणे, नवी मुंबईसह कोकण परिक्षेत्रात पोलिसांकडून कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या त्याचा आढावा घेण्यात आला, तसेच निवडणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्या. या वेळी कोकण परिक्षेत्रातील नवी मुंबई, ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस आयुक्त, सहपोलीस उपायुक्त त्याचप्रमाणे पालघर, ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. मतदान शांततेत पार पाडण्याकरिता कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ज्या गुन्हेगारांमुळे वा व्यक्तींमुळे निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण होत असेल अशांवर कशा प्रकारे कारवाई करावी, इतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडांचा बंदोबस्त कसा करावा, तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत पोलीस महासंचालकांनी सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. या बैठकीच्या आयोजनासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार व त्यांच्या सहकारी अधिकार्‍यांनी मेहनत घेतली.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply