पेण : प्रतिनिधी
रायगड जिल्हा व पेण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. 29) पेण पंचायत समिती कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अनेकदा मोर्चे, आंदोलने, उपोषणे तसेच ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन देऊनसुध्दा सरकार त्याकडे लक्ष देत नसल्याने अखेर ग्रामपंचायत कर्मचार्यांनी शुक्रवारी रामवाडी ते पेण पंचायत समिती कार्यालयापर्यंत मोर्चा काढून धडक दिली.
या मोर्चात रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सचिव रमेश तांडेल, पेण तालुका अध्यक्ष प्रकाश पडवळ, उपाध्यक्ष दत्तात्रेय म्हात्रे, महिला उपाध्यक्ष असावरी टेंबे, तालुका सचिव सचिन गायकवाड, सहसचिव मनस्वी पाटील आदींसह पेण तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने पंचायत समितीच्या सभापती सरिता पाटील व विस्तार अधिकारी प्रसाद म्हात्रे यांची भेट घेवून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.