भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजवणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या नोटीशीनंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर अश्लाघ्य भाषेत टीका करण्यात आली आहे. या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप नेत्यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.
भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी ट्वीट करीत शिवसेनेवर टीका केली आहे. ‘प्रभादेवीच्या गल्लीत बसून वर्षानुवर्षे दुसर्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करीत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय, तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करीत आहेत. चला हवा येऊ द्या!,’ असे शेलार यांनी म्हटले आहे.
भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनीही संजय राऊतांवर शरसंधान साधले आहे. कार्यकारींनी 700 शब्दांच्या अग्रलेखात सडके, कुजके, पादरे असे शब्द भांडार खुले करून विद्वत्तेचे प्रदर्शन केले आहे. (त्यापेक्षा) दोन ओळी त्या 55 लाखांबद्दल खरडल्या असत्या तर विषय संपला असता, असे भातखळकर यांनी नमूद करून ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करणार्यांनाही उत्तर दिले. अर्णबवर कारवाई होते तेव्हा कायदा त्याचे काम करीत होता आणि आता, असा सवाल त्यांनी ट्विटमध्ये केला आहे.
सामना आता वृत्तपत्र राहिले नाही तर हॅण्डबिल
आहे. संविधानाची भाषा करणार्या राऊतांना एक ईडीची नोटीस आली तर भीती का वाटते, असा सवाल भाजप आमदार राम कदमांनी केला आहे, तर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, विश्वासघाताने सत्तेवर येता येते, पण सत्ता चालवण्यासाठी क्षमता लागते. शिवसेनेने वर्षभरात काहीही केले नाही. किमान लोकहिताची कामे करा.