पेण : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, निष्पाप जीवावर अत्याचार करून तिचा खून करण्याची ही हृदय हेलावणारी घटना आहे. हा एक प्रकारे अतिरेक असून, कायद्याचा जो धाक पाहिजे, जो दरारा पाहिजे तो महाराष्ट्रात दिसत नाही. यातूनच अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.
दरेकर पुढे म्हणाले की, पुणे, रोहा व आज पेणमध्ये अशा प्रकारची घटना घडली. गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांना कायद्याचा राहिलेला दिसून येत नाही. पेणमधील विकृतावर गुन्हे दाखल असूनसुद्धा त्याने पुन्हा असे कृत्य करण्याचे धाडस केले. ते पाहता राज्य सरकारने या गोष्टी गांभीर्याने घेऊन अशा प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर ते कारागृहातून बाहेर आल्यानंतरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे तसेच त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. यामुळे अशा घटना रोखण्यास मदत होईल असे सांगून या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी योग्य पावले उचलण्याची मागणी मी मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री यांच्याकडे करणार आहे, मात्र कायद्याची अंमलबजावणी कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याबाबत राज्य सरकारला जाब विचारला जाईल, असेही दरेकर म्हणाले.
Check Also
संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …