Breaking News

प्रवासी शेड दुरुस्तीकडे विभाग नियंत्रकांचे दुर्लक्ष

मुरुड : प्रतिनिधी

चक्री वादळात मुरूड एसटी आगारातील प्रवासी शेड  व आरक्षण कक्षाच्या इमारतीचे छप्पर उडून गेले होते. मात्र या छप्परावर पत्रे बसवण्याकडे विभाग नियंत्रकांकडून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथील एसटी कर्मचार्‍यांना इमारतीबाहेर बसून कामकाज करावे लागत आहे तर प्रवाशांना कडक  उन्हात बसून बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. 15 दिवसात सदर इमारतीची दुरुस्ती केली नाही, तर  आंदोलन छेडण्याचा इशारा मुरूड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सूर्वे यांनी दिला आहे.

एसटीच्या मुरूड आगाराची इमारत एसटीच्या मालकीची आहे. या इमारतीवरील पत्रे 3जूनच्या चक्रिवादळात उडून गेले आहेत. या घटनेला सात महिने उलटून गेले तरीही  रायगडच्या विभाग नियंत्रकांना साधे पत्रे बसवता आले नाहीत. त्याचा त्रास कर्मचारी व प्रवाशांना होत आहे. कर्मचार्‍यांना बेवारसाप्रमाणे इमारतीच्या बाहेर येऊन कामे  करावी लागत आहेत. तर प्रवाशांना उन्हातान्हात तिष्ठत बसावे लागत आहे.  याबाबत समाजसेवक अरविंद गायकर यांनी विभाग नियंत्रकांकडे पत्रव्यवहार करून दाद मागितली होती. मात्र त्याची दखल नसल्याने इमारत आहे त्याच स्थितीत आहे. सात महिने होऊनसुद्धा साधे पत्रे बसवता आले नाही, त्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

मुरुड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सूर्र्वेे यांनी एसटीचे मुरूड आगार प्रमुख सलील वाघचौरे यांची नुकतीच भेट घेतली. या वेळी त्यांनी आगाराच्या छप्परावर त्वरीत पत्रे बसवावे व इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. येत्या 15 दिवसात विभाग नियंत्रकांनी सदरील इमारतीची दुरुस्ती केली नाही, तर सर्व प्रवाशांना  सोबत घेऊन मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा सूर्वे यांनी या वेळी दिला.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply