8 गावे 4 वाड्या टंचाईग्रस्त; टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी
म्हसळा : प्रतिनिधी
दुरूस्तीचे काम करण्यासाठी पाभरे (ता. म्हसळा) धरणातील बहुतांश पाण्याचा विसर्ग केल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या नळ पाणीपुरवठा योजना आता पाण्याअभावी ठप्प झाल्या आहेत. त्याचा मोठा फटका तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजनेला बसला आहे. या योजनेवर अवलंबून असलेली आठ गावे आणि चार वाड्यांना आता पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजना समितीने म्हसळा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाभरे धरणामधून विंधन विहिरीमार्फत तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. या योजनेतून तोंडसुरेसह सकलप, खारगाव खुर्द, रेवली, बनोटी, गणेशनगर, वरवठणे, आगरवाडा, पेडांंबे ही गावे आणि जंगमवाडी, तोंडसुरबौद्धवाडी, वरवठणे कोंड, आगरवाडा येथील बौद्धवाडी या वाड्यांंना पाणीपुरवठा केला जातो. मात्र दुरूस्तीचे काम हाती घेतल्याने या आठ गावे आणि चार वाड्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तेथे त्वरीत टँकरने पाणीपुरवठा सुरु करावा, अशा मागणीचे म्हसळा तहसीलदारांना दिले. ते नायब तहसीलदार के. टी. भिंगारे स्वीकारले. या वेळी तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजना समितीचे अध्यक्ष महादेव पाटील, उपाध्यक्ष मनोज नाक्ती, सचिव सखाराम पवार, उपसरपंच जनार्दन गाणेकर, अंकुश गाणेकर, दत्ताराम काजारे, अनंत पाटील, जहूर शिरशिकर, अ. सत्तार चाउस, अकलाक शिरशिकर, कुतुबुद्दीन गणतारे, साजिद तालिब, गोविंद भायदे, प्रकाश गाणेकर, नारायण नाक्ती आदी सदस्य उपस्थित होते.