Breaking News

माणगावात वाहतूक पोलिसाला मारहाण : 18 आरोपींना अटक

माणगाव : प्रतिनिधी

वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकाणी कारवाई केल्याचा राग मनात धरून रिक्षा चालक संतोष शिर्के, विकास मोरे, राजेंद्र मोरे यांच्यासह सुमारे 60 ते 70जणांनी वाहतूक पोलीस निवास साबळे यांना सोमवारी (दि. 4) सायंकाळी 5.30. वाजण्याच्या सुमारास शिवीगाळ व मारहाण केली. माणगाव निजामपुर रोडवरील अमित कॉम्प्लेक्सजवळ झालेल्या या घटनेत वाहतूक पोलीस साबळे जबर जखमी झाले असून त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील अठरा आरोपींना अटक केली आहे. साप्ताहिक सुट्टी असल्याने वाहतूक पोलीस निवास साबळे सोमवारी सायंकाळी माणगाव निजामपुर रोडवरील अमित कॉम्प्लेक्सजवळ उभे होते. त्यावेळी चव्हाणवाडी गावातील रिक्षा चालक आणि ग्रामस्थांनी पूर्वीचा राग मनात धरून शिवीगाळ करीत निवास साबळे यांना बाबूंच्या काठ्यांनी व हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत वाहतूक पोलीस साबळे जखमी झाले असून त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या वेळी झालेल्या झटापटीत साबळे यांच्या गळ्यातील चैन तुटून गहाळ झाली. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात भा.दं.वि कलम 324,143, 147,149,427,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी संतोष शिर्के, विकास मोरे, परेश सावंत, मंगेश जाधव, विनोद बेलोसे, अमोल शेळके, सागर शेळके, संदेश जाधव, दत्ताराम कळमकर, संतोष सावंत, अरविंद  शिर्के, गणेश खानविलकर, निलेश कळमकर, गणेश कळमकर, राजेंद्र  पवार, विशाल बेलोसे, महेश शिर्के, महेश भिलारे (सर्व रा. चव्हाणवाडी, ता. माणगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या घटनेची माहिती समजताच माणगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांनी घटना स्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांदेकर करीत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply