Breaking News

रायगड जिल्ह्यातील आगरदांडा, जीवना बंदरांना मिळणार नवसंजीवनी

अलिबाग : प्रतिनिधी

केंद्राच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत कोकण किनारपट्टीवरील नऊ मासेमारी बंदरे विकसीत केली जाणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील आगरदंडा आणि जीवना या दोन बंदरांचा समावेश आहे. या बंदरांमध्ये मासे उतरवण्याच्या सुविधांसह पर्यटकांना उपयुक्त अशा सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे बंदरांना नवसंजीवनी मिळणार आहे. आतापर्यंत विकासापासून दूर राहिलेल्या या बंदर परिसरातील नागरिकांच्या सार्वांगिण विकासासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. केंद्राच्या सागरमाला प्रकल्पातंर्गत नऊ मासेमारी बंदरे आणि 16 मासे उतरविण्याची ठिकाणे विकसीत केली जात आहेत. या नऊ मासेमारी बंदरातील आगरदांडा, जीवना कोळीवाडा आणि हर्णे बंदराचा विकास पर्यटनवाढीसाठी करण्यात यावा, अशा मागणीचा प्रस्ताव आहे. मासळी उतरवण्यासाठी आवश्यक असलेल्या जेट्टीसह कोल्ड स्टोरेज, मरिना, आर्ट गॅलरी, स्वच्छतागृह, उपहारगृह उभारण्यात याव्यात, असा हा प्रस्ताव आहे. रायगड जिल्ह्यातील आगरदंडा, जीवना व रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे या तिनही बंदरांसाठी 558.6कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. केंद्रीय नौवहन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी या संदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे.  या तीन बंदरांबरोबरच कोकण किनारपट्टीवर 20 मासळी उतरविण्याची ठिकाणे आणि लहान चार बंदरांच्या विकासासाठी विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. समुद्रालगत असणारी ही लहान बंदरे विकसीत झाल्यास वाहतुकीबरोबरच पर्यटकांची रहदारी वाढणार आहे. या बंदरांचे सर्वेक्षण बंगलोर येथील सीआयसीईएफ या संस्थेने पुर्ण केला असून अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. यासाठी अंदाजीत 650 कोटी रुपयांचा  विकास आराखडा तयार करण्यात  आल्याचीही माहिती महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुमंत भांगे यांनी दिली.

अग्रक्रमाने या तीनही बंदरांचे डीपीआर, सर्वेक्षण, उपलब्ध साधने यांचा अहवाल तयार करुन तो केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. केंद्राची मंजुरी आल्यानंतर या बंदरांचा विकास सागरमाला, पंतप्रधान मस्त्य संपदा योजना किंवा अन्य कोणत्या योजनेतून करायचा हे ठरणार आहे. -सुमंत भागे, व्यवस्थापकीय संचालक, राज्य मत्स्य उद्योग महामंडळ

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply