Breaking News

रायगड भाजपचे उरण हे उगमस्थान, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन, विजयी मेळावा उदंड उत्साहात

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष फारसा नव्हता, परंतु उरणमध्ये महेश बालदी यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी भाजप मजबूत ठेवला होता. त्यामुळे उरण हे रायगड भाजपचे उगमस्थान आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विजयी मेळाव्यात केले. भाजपचा सबका साथ सबका विकास, हा नारा तुम्ही निवडून दिलेले तिन्ही आमदार यशस्वीरीत्या पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्तकेला.

उरण तालुका भाजपच्या वतीने भव्यदिव्य विजयी मेळावा शनिवारी (दि. 14) शहरातील पेन्शनर पार्क येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते. त्यांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सलग तीन वेळा निवडून येऊन विजयाची हॅट्ट्रिक करणारे पनवेलचे आमदार व भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी व पेणचे आमदार माजी मंत्री रविशेठ पाटील यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याला भाजपचे रायगड जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, उरण शहराध्यक्ष कौशिक शहा, महिला मोर्चा पनवेल तालुका अध्यक्ष व पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत, उरण तालुका अध्यक्ष संगीता पाटील, शहर अध्यक्ष संपूर्णा थळी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शेखर तांडेल, शहर अध्यक्ष निलेश पाटील, भाजप जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, खालापूर अध्यक्ष बापू घारे, उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, पंडित घरत, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, कामगार नेते सुधीर घरत, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, विस्तारक अविनाश कोळी, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, अन्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते. या वेळी भाजपच्या उरण तालुका अध्यक्षपदी रवी भोईर यांची फेरनिवड करण्यात आली.

– रायगडात भाजप नंबर वन : आमदार प्रशांत ठाकूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत विकासाची भरपूर कामे केली आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल टाकून राज्याला अग्रक्रमावर आणले. त्यांच्या तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने मी सिडको अध्यक्ष झालो, असे सांगून आमदार प्रशांत ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले की, रायगड जिल्ह्यात भाजप सध्या एक नंबरचा पक्ष बनला आहे. यामागे सर्वांची मेहनत आहे. आपल्या भाषणात त्यांनी आमदार महेश बालदी यांचे कौतुक केले. आमदार नसतानाही बालदी यांनी  विकासाची अनेक कामे केली आहेत. येथे अनेक समस्या आहेत. त्या सर्व सुटल्याशिवाय राहणार नाहीत.

– दिलेली आश्वासने पूर्ण करणार : महेश बालदी

आताचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असा दावा करून आमदार महेश बालदी म्हणाले की, येत्या दीड वर्षात उरणला रेल्वे येणार असून, भविष्यात येथे मेट्रोसुद्धा धावेल. 15 जानेवारीपासून करळ जेएनपीटी ब्रिजवरून न जाता सरळ पनवेलला सुसाट जाता येणार आहे. विधानसभा निवडणुकीत जी आश्वासने मी दिली होती, ती पूर्ण करणार आहे. मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढलो व जिंकून आलो. उरण विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ जनतेने माझ्यावर  विश्वास टाकला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या वेळी आमदार बालदी यांनी विवेक पाटील व मनोहर भोईर या माजी आमदारांचा खरपूस समाचार घेतला.

– रामशेठ ठाकूर विजयाचे शिल्पकार : रविशेठ पाटील

माजी मंत्री आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले की, रामशेठ ठाकूर हे रायगड जिल्ह्यातून शेकापला हद्दपार करणारे व भाजपच्या विजयाचे शिल्पकार आहेत. या निवडणुकीत त्यांनी शेकापला मूठमाती दिली. ते पुढे म्हणाले, शेकापचे काम कृतीत शून्य आहे. रायगड जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार आहेत. ते सर्व चांगले काम करून विकासाची गंगा आणतील. महेश बालदी यांच्याकडे चांगली विचारसरणी असून, काम करून घेण्याची कलाही आहे. अपक्ष म्हणून उभे राहून निवडून येणे मोठे कठीण आहे, परंतु बालदी यांनी निवडणूक लढवून ते जिंकून आले. त्यांचे मी कौतुक करतो.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply