नागोठणे : प्रतिपादन
रायगड जिल्ह्यात लग्नाचा हळदी समारंभ साग्रसंगीत करण्याची परंपरा आहे. या परंपरेला छेद देण्याचा स्तुत्य उपक्रम रोहे तालुक्यातील बाहे या गावात करण्यात आला. बाहे गावात रोहे तालुका कुणबी युवक संघटनेचे अध्यक्ष अनंत थिटे यांच्या नातेवाईकाचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. लग्नाचा आदल्या दिवशी हळदी समारंभाच्या वेळी इतर कोणताही कार्यक्रम न करता वराच्या कुटुंबाकडून उपस्थित महिलांना श्री महालक्ष्मी महात्म्य हे पुस्तक भेटीदाखल देण्यात आले.
महिलांना पुस्तकाची भेट देण्याचा उपक्रम रोहे तालुक्यात पहिल्यांदाच करण्यात आला असून विवाह सोहळ्याच्या निमित्ताने वेगळी प्रथा पाडण्यात आम्हाला यश आले आहे. उपस्थित महिलांसह हजर नसलेल्या महिलांच्या घरीसुद्धा अशी पुस्तके पाठवली असून साधारणपणे हजार महिलांना हे श्री महालक्ष्मी महात्म्य पुस्तक भेट दिले असल्याचे थिटे यांनी स्पष्ट केले.