Breaking News

‘मूठभर शेतकर्यांच्या मदतीने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न’

मुंबई : प्रतिनिधी

सहा महिन्यांपूर्वी हे तीन कृषी सुधारणा कायदे झाले असताना, आता विरोधकांना जाग आली आहे व ते म्हणत आहेत की हे कायदे शेतकर्‍यांचे नुकसान करणारे आहेत, म्हणजे सहा महिने काय ते झोपा काढत होते का? एका राज्यातील मूठभर शेतकर्‍यांच्या मदतीने गेल्या 40 दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरात बाकी ठिकाणी कुठेही या कायद्याला विरोध नाही उलट समर्थन आहे, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यास विरोध करणार्‍यांवर गरुवारी टीका केली.

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथे गुरुवारी (दि. 7) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते खासदार नारायण राणे, आमदार रविंद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते.

या वेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, देशभरात बाकी ठिकाणी कुठेही या कायद्याला विरोध नाही उलट समर्थन आहे. त्यामुळे सहा महिन्यानंतर जाग आल्यानंतर एका राज्यातील मूठभर शेतकर्‍यांच्या मदतीने 40 दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर जर देशभरातील शेतकरी रस्त्यावर आले नाही आणि त्यांनी हे काय नाटक सुरू आहे? आमचा कृषी कायद्याला पाठिंबा आहे असे म्हटले नाही तर त्यांचे (विरोधकांचे) खरे होईल.

तसेच, महाराष्ट्रात या कायद्याला विरोध नाही. मग आपण रस्त्यावर का यायचे? तर, ते (विरोधक) रस्त्यावर येऊन थेट कॅनडापासून जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की आमच्यावर अन्याय होत आहे. म्हणून आपल्याला हे कायदे आमच्या फायद्याचे आहेत. या कायद्यामुळे आमचे आयुष्य समृद्ध होणार आहे हे जगाला सांगावे लागणार आहे. मूठभर शेतकरी दिल्लीत बसले आहेत. तिथे काय-काय सुरू आहे हे आपल्याला माध्यमांद्वारे दिसत आहे. त्याला उत्तर म्हणून हे दाखवण्याची आवश्यकता आहे की संपूर्ण देश पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे. संपूर्ण देश या कायद्यांच्या बाजूने आहे. संपूर्ण देश या कायद्याचे समर्थन करतो आहे. हे दाखवण्याचा एक भाग ते दाखवण्याचे एक माध्यम ही आजची ट्रॅक्टर रॅली आहे, शेतकर्‍यांची रॅली आहे. ज्यामध्ये आपण काही मागण्या करत नाहीत. तर, शेतकर्‍यांच्या सन्मानासाठी भाजप मैदानात असा संदेश देत आहोत. असे या वेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

राहुल गांधींना, उद्धव ठाकरेंना शेतीमधले काय कळते? -नारायण राणे

आपला शेतकरी कष्टाने जे पिकवतो, उत्पादन घेतो. त्याला जिथे जास्त पैसे मिळतील तिथे त्याने माल विकावा. योग्य मोबदला मिळाला याचे शेतकर्‍यांना समाधान मिळाले पाहिजे. म्हणून असा कायदा पंतप्रधान मोदींनी आणला. शेतकर्‍यांच्या हिताचा बंधने सर्व काढून टाकली तर मग चुकले काय? का इथे आंदोलने होत आहेत? ही राजकीय आंदोलने आहेत. यात समेट होईल असे मला वाटत नाही. राहुल गांधीला शेतीमधले काय कळते? आणि शेतकर्‍यांना पाठिंबा देण्याचा गोष्टी करतात. ठराविक राज्यातील शेतकरी आहेत. जे दलाल होते त्यांना आंदोलन करायला लावले आहे, असे भाजप नेते नारायण राणे म्हणाले.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply