Breaking News

दक्षिण नवी मुंबईसाठी सिडकोकडून ‘हेटवणे’तील पाणीसाठा आरक्षित

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडकोतर्फे दक्षिण नवी मुंबईतील पाणी पुरवठ्यात वृद्धी करण्यासाठी हेटवणे धरणातील अतिरिक्त 120 दशलक्ष लीटर प्रती दिन (एमएलडी) पाणी साठा आरक्षित करण्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला रु. 119.80 कोटी शुल्क देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोतर्फे पाणी पुरवठा करण्यात येणारी गावे, नोड आणि विविध प्रकल्पांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

सद्यस्थितीत नवी मुंबईतील पनवेल महानगरपालिका क्षेत्र, सिडको अधिकार क्षेत्रातील काही नोड व नजीकच्या परिसरातील गावे यांना हेटवणे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत हेटवणे धरणातून सिडकोला 150 एमएलडी पाणी साठा उपलब्ध होत आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने 250 एमएलडी क्षमतेचे कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरीत केले आहे. या धरणाच्या आराखड्याचे काम प्रगतीपथावर आहे.

सिडकोने पनवेल आणि उरण तालुक्यांत विकसित केलेल्या दक्षिण नवी मुंबईची लोकसंख्या 20 लाखांपर्यंत गेली आहे. या भागात येणारे तळोजा, नवीन रोडपाली, कामोठे, कळंबोली, उलवे आणि द्रोणागिरी या नोडमध्ये सिडकोची महागृहनिर्माण योजना तसेच विविध महत्त्वाचे प्रकल्प साकारण्यात येत आहेत. या भागातील निवासी क्षेत्रांची पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच नवी मुंबईची वाढती लोकसंख्या आणि सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, महागृहनिर्माण योजना आणि नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) या प्रकल्पांमुळे सन 2050 पर्यंत नवी मुंबई क्षेत्रातील पाण्याची अंतिम मागणी 1275 एमएलडी पर्यंत असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन सध्याच्या परिस्थितीत हेटवणे धरणातून तातडीने अतिरिक्त पाणी साठा मंजूर करून घेण्याचा व्यवहार्य निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे. हेटवणे धरणातील 120 एमएलडी अतिरिक्त पाणी साठा मंजूर झाल्याने 2025 पर्यंत प्रस्तावित असणार्‍या विविध प्रकल्पांची पाण्याची मागणी पूर्ण होणार आहे. 

हेटवणे धरणातून सिडकोद्वारे आणले जाणारे पाणी डोंगर उतारावरून येत असल्याने कमी दाब आणि अल्प पुरवठा अशा समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे सिडकोतर्फे हेटवणे जलवाहिनी भूमिगत करण्याचे काम गेल्यावर्षांपासून सुरू होते. हेटवणे धरणापासून शहराकडे येणार्‍या जलवाहिनीसाठी हमरापूर येथे टेकडीच्या खालून साधारणत: 20 ते 25 मीटर खोलीवर बोगदा खोदण्याचे काम जवळ जवळ पूर्णत्वास आले आहे. या बोगदयाची लांबी 700 मीटर असून 1500 व्यासाची एम.एस. जलवाहिनी टाकण्यात येत आहे. हा प्रकल्प फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यामुळे हेटवणे धरणातून सिडकोला 30 एमएलडी अतिरिक्त पाणी पुरवठा वाढणार आहे.

तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती

पनवेल महापालिकेच्या हद्दीत येणार्‍या सिडको वसाहती, उलवे, द्रोणागिरी आणि सिडकोच्या भविष्यातील प्रकल्पांना आवश्यक पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिडकोतर्फे एका तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. ही समिती संपूर्ण पाणी पुरवठा आणि पाण्याचे स्रोत यांचा अभ्यास करून सिडकोला मार्गदर्शन करेल असे प्रतिपादन सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी केली आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply