नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या हंगामाचे आयोजन यूएईत केले होते. दीड महिन्यापेक्षा जास्त काळ चाललेल्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करीत सलग दुसर्यांदा विजेतेपद पटकावले. त्यानंतर आता बीसीसीआयने पुढच्या हंगामाची सुरुवात केली आहे. आयपीएलच्या 14व्या हंगामाची लवकरच लिलाव प्रक्रिया होणार आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी 11 फेब्रुवारी रोजी लिलाव होण्याची शक्यता आहे. कारण आयपीएलमधील आठही संघ मालकांना 20 जानेवारीपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनेनुसार आयपीएलमधील आठही संघ लिलाव प्रक्रियेच्या तयारीला लागले आहेत, तसेच संघातील कोणत्या खेळाडूला रिटेन करायचे यावरही काम सुरू आहे. 2022च्या आयपीएल हंगामात दोन संघांचा समावेश होणार आहे. त्यामुळे आयपीएल-15मध्ये सर्व खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील. त्यामुळे यंदा कोणते संघ कोणत्या खेळाडूंना संघात ठेवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
स्पर्धेसाठी भारतच पहिली पसंती
यंदाच्या आयपीएलचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले नसले तरी 11 एप्रिल ते 6 जून या कालावधीत आयपीएलचा 14वा हंगाम रंगण्याची शक्यता आहे. लिलाव प्रक्रिया पार पडल्यानंतर आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचे वेळापत्रकही जाहीर होणार आहे. यंदाच्या हंगामासाठी पहिली पसंती भारतच असणार आहे, मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारने परवानगी नाकारल्यास पुन्हा एकदा ही स्पर्धा दुबईत होऊ शकते.