Breaking News

लोकनेते दि.बा. पाटील यांचे कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील

आमदार प्रशांत ठाकूर यांचे उद्गार; वडघरमध्ये आरोग्य शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकनेते दि.बा. पाटील यांचे कार्य हीच त्यांची खरी ओळख होती आणि त्यांचे हे महान कार्य येणार्‍या अनेक पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील, असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 13) पनवेलमधील वडघर येथे काढले. भूमिपुत्रांचे कैवारी, लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांच्या 100व्या जयंतीचे औचित्य साधून वडघर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत मोफत आरोग्य तपासणी आणि चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि लोकनेते दि.बा. पाटील 27 गाव संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘दिबां’नी आपले संपूर्ण आयुष्य प्रकल्पग्रस्त आणि शेतकर्‍यांच्या हक्कासाठी अर्पण केले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात सर्वसामान्य जनतेला उत्तम आरोग्यसेवा मिळावी या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
या शिबिरास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन ‘दिबां’च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शिबिरामध्ये नागरिकांसाठी जनरल चेकअप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, हाडांचे विकार, शंकरा आय हॉस्पिटलतर्फे नेत्र तपासणी, कान-नाक-घसा तपासणी अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिरही झाले. परिसरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, जितेंद्र म्हात्रे, नंदराज मुंगाजी, भाजप पश्चिम मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ, गजानन पाटील, सुभाषशेठ म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि 27 गाव संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

सरके चुनर… हटाव मोहीम सफल

गाणं कोणतेही का असेना ते लिहिताना, स्वरबद्ध करताना, त्यावर संगीतसाज चढवताना, त्याचे चित्रीकरण करताना, त्यावरची …

Leave a Reply