उरण ः वार्ताहर

मच्छीमार बांधवांना होणार्या नाहक त्रासाबद्दल आमदार महेश बालदी यांनी नुकतीच पोलीस उपायुक्त बंदर परिमंडळ-2 (मुंबई)चे गणेश शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली व पत्र दिले.
उरण मतदारसंघातील करंजा गावात सुमारे 500 मासेमारी यांत्रिकी नौका असून, या मासेमारी यांत्रिकी नौकांनी पकडलेली मासळी ते मुंबईतील ससून डॉक व भाऊचा धक्का येथे विकत असतात. या नौका येताना कुलाबा व येलोगेट पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणार्या गस्ती नौका संस्थेच्या मासेमारी यांत्रिकी नौकांना नाहक त्रास देत असतात. याबाबत पोलीस उपायुक्त बंदर परिमंडळचे गणेश शिंदे यांची आमदार महेश बालदी यांनी भेट घेऊन चर्चा केली व मच्छीमारांना होणार्या त्रासातून सोडवणूक करण्यासाठी पत्र दिले.
या वेळी आमदार महेश बालदी, करंजा मच्छीमार सोसायटीचे माजी चेअरमन प्रदीप नाखवा, नारायण नाखवा, अशोक नाखवा, रवींद्र नाखवा, गणेश नाखवा, परमानंद नाखवा, दिलीप कोळी, भूषण भाटे यांच्यासह मच्छीमार बांधव उपस्थित होते.