Breaking News

शिवीगाळ करून करिअर संपवण्याची धमकी

कृणाल पांड्याविरोधात दीपक हुड्डाची तक्रार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोनाच्या विश्रांतीनंतर देशात प्रथमच महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. रविवारपासून सुरू होणार्‍या मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेपासून देशांतर्गत क्रिकेट मोसमाला प्रारंभ होत आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीच बडोद्याच्या संघातील एक वाद समोर आला आहे. बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्याविरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार करीत अखेरच्या क्षणी दीपक हुड्डाने स्पर्धेतून माघार घेतली आहे.
रविवारी होणार्‍या सामन्यापूर्वी बडोद्याच्या रिलायन्स स्टेडियमवर सराव करताना कृणाल आणि दीपक यांच्यात भांडण झाल्याचे समोर आले आहे. दीपक हुड्डाने याबाबत बीसीसीआयला ई-मेलद्वारे कळविले आहे. यामध्ये कृणाल पांड्याने त्याला शिवीगाळ केल्याची तक्रार केली आहे. शिवाय आगामी टी-20 मुश्ताक अली स्पर्धेत खेळणार नसल्याचे कळविले आहे. दीपक प्रशिक्षकाच्या परवानगीनेच सराव करीत असताना अष्टपैलू पांड्याने त्याला धमकावण्यास सुरुवात केल्याचेही दीपकने आपल्या ई-मेलमध्ये लिहिले आहे. काही प्रसारमाध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार दीपकबरोबर वाद सुरू असताना कृणालने क्रिकेट करिअर संपवून टाकेल, अशी धमकी दिली आहे.
दीपक हुड्डाने 46 प्रथम श्रेणी सामने, 68 लिस्ट ए सामने आणि 123 टी-20 सामन्यांत बडोद्याच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, तर आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांकडून तो खेळला आहे. दरम्यान, फेब्रुवारीत ‘आयपीएल’चा लिलाव होत असल्याने देशातील बिगर आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडे सर्वांचे विशेष लक्ष असेल. वर्षअखेरीस भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक क्रिकेट
स्पर्धेसाठी खेळाडूंची दुसरी फळी तयार ठेवण्याची जबाबदारी नव्या राष्ट्रीय निवड समितीसमोर असेल. ऋतुराज गायकवाड, प्रियम गर्ग, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, सर्फराझ खान, आर. साईकिशोर आणि एम. सिद्धार्थ या नव्या चेहर्‍यांकडेही निवड समितीचे लक्ष असेल. जैवसुरक्षा वातावरणात सहा वेगवेगळ्या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply