नवी मुंबई : प्रतिनिधी
नेरुळ सेक्टर-19 येथील भीमाशंकर सोसायटीमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांच्या स्वनिधीतून उभारण्यात आलेल्या ओपन जिमचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि. 10) झाला. या वेळी सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी नगरसेविका सुरेखा इथापे, माजी नगरसेवक व भाजपा महामंत्री निलेश म्हात्रे, अशोक चॅटर्जी, संपत शेट्टी, प्रमोद पाटे, रणजित नाईक, जयेश थोरवे, रवी डेरे, सुनिल घुले, बाबासाहेब राजळे तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग उपस्थित होते. या वेळी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी सांगितले की, आमदार मंदा म्हात्रे यांच्या कामाची पद्धत व काम करण्याची प्रचंड इच्छाशक्तीही अनोखी आहे. स्वनिधीतून काम करणार्या महाराष्ट्रातील एकमेव आमदार मी पाहिल्या आहेत. नवी मुंबईतील अनेक नेते श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असले तरी मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा प्रलंबित प्रश्न आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने सुटला गेला आहे. याकरिता मी त्यांचे आभार मानतो. या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, नेरूळ येथील भीमाशंकर सोसायटी ही खूप मोठी सोसायटी असून यामध्ये लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षात घेता त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. सोसायटीतील पदाधिकार्यांनी रहिवाशांच्या व्यायामाकरिता सोसायटीच्या आवारात ओपन जिम उभारणीची मागणी केली होती. सोसायटीच्या आवारातील कंडोनियम अंतर्गत कामे आमदार निधीतून होत नसल्याने ही ओपन जिम 8.50 रुपये लाखांच्या स्व:निधीतून उभारण्यात आली आहे. सोसायटीमध्ये सभा मंडप व व्यायाम शाळेतील साहित्याचीही मागणी करण्यात आली असून त्याकरीताही लवकरच आमदार निधीची तरतूद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईला यापूर्वी मी सहा रुग्णवाहिका उपलब्ध केल्या असून आताही मी अजून सुसज्ज सर्व सुविधांयुक्त अशा पाच रुग्णवाहिका नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी देणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रक्तदानासाठी, डोळ्यांच्या उपचारासाठी, फिरता दवाखाना शिबिरासाठी तसेच वातानुकुलीत कार्डियाक रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. तसेच एक कोटी आमदार निधी महिलांच्या सुपर स्पेशालीस्ट प्रसाधन गृहाकरिता देण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकांच्या शाळाही स्मार्ट व्हाव्या याकरिता डिजिटल शाळांकरिताही आमदार निधीची तरतूद करण्याचा या नवीन वर्षात संकल्प केला असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.