वहूर गावात पाच कावळे मृतावस्थेत; भीती न बाळगण्याचे आवाहन
महाड : प्रतिनिधी
बर्ड फ्लूचे हे लोन आता महाडमध्ये पोहचले असल्याची भीती येथीन नागरिकांना वाटत आहे. तालुक्यातील वहूर गावात शुक्रवारी (दि. 5) सकाळी पाच कावळे मृतावस्थेत तर एक कावळा तडफडत असल्याचे आढळून आला. या कावळ्यांचा मृत्यू नेमका बर्ड फ्लूमुळेच झालाय का याची खात्री तपासणी केल्यानंतरच केली जाणार आहे. नागरिकांनी भीती न बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
विविध भागातील बर्ड फ्लूचे हे लोन आता महाड तालुक्यात येवून पोहोचले आहे. महाड तालुक्यातील वहूर गावात शुक्रवारी सकाळी पाच कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ अनंत नवले यांच्या घराशेजारी हे कावळे मृतावस्थेत आढळून आले. सरपंच जितेंद्र बैकर यांनी ही माहिती तत्काळ तालुका पशुवैद्यकीय अधिकार्यांना दिली असता त्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि या पक्ष्यांचे नमुने ताब्यात घेतले आहेत. कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाला आहे का अन्य काही कारण आहे याचा तपास केला जाणार आहे.
वहूर गावात एकूण पाच कावळे मृतावस्थेत सापडले आहेत. या कावळ्यांचे नमुने पुणे येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात पाठवून दिले आहेत. कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झालाय का हे अहवाल आल्यानंतरच पुढे येईल, असे दासगाव पशुधन पर्यवेक्षक एस. एस. चिखलकर यांनी सांगितले.