

श्रीवर्धन : प्रतिनिधी
परराज्यातील मच्छीमार बोटींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने, तसेच पर्सनेट व एलईडीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मच्छीमारी होत असल्याने श्रीवर्धन परिसरातील स्थानिक छोट्या मच्छीमारांना फारच कमी प्रमाणात मासे मिळत आहेत. त्यामुळे स्थानिक छोट्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
खराब हवामान आणि खोल समुद्रामध्ये सतत होत असलेला बदल यामुळे मासेमारी करण्यासाठी छोटे मच्छीमार धजावत नाहीत. मासेमारीसाठी खोल समुद्रात जाताना डिझेल, बर्फ, गोडे पाणी, ऑइल, रेशनिंग यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो, मात्र खोल समुद्रात जाऊनसुध्दा मासे मिळत नाहीत. त्यामुळे मच्छीमारांना रिकाम्या हाताने परत यावे लागत आहे. त्यातच श्रीवर्धन परिसरातील समुद्रात परराज्यातील नौका मासेमारीसाठी येऊ लागल्या आहेत. त्या एलईडीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मासे पकडून त्यांच्या राज्यात घेऊन जातात. त्या नौकांवर अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसविण्यात आलेली असते. त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त मासे पकडले जातात, शिवाय या मोठ्या नौकांवरील मच्छीमार स्थानिक छोट्या मच्छीमारांना दमदाटी करीत असतात. त्यामुळे स्थानिक छोटे मच्छीमार त्रस्त झाले आहेत.
परराज्यातील मच्छीमारी नौका श्रीवर्धन परिसरात येत असल्याने स्थानिक छोटे मच्छीमार अडचणीत आले असून, संबंधित खात्याने या मच्छीमारी नौकांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.