Breaking News

प्रचार शिगेला, दर्जा घसरला!

भारताच्या 17व्या लोकसभेसाठी 10 मार्च 2019 रोजी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सात टप्प्यांत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यापैकी महाराष्ट्रात 11 एप्रिलपासून 29 एप्रिल 2019 पर्यंत चार टप्प्यांत मतदान घेण्यात येणार आहे. एका बाजूला 56 इंचाच्या छातीचा कणखर, कर्तबगार, कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसर्‍या बाजूला 56 पक्षांची महाआघाडी असा हा मुकाबला देशवासीयांसमोर होणार आहे.

56 पक्षांच्या महाआघाडीचे नेतृत्व कोण करणार याबद्दल हे 56 पक्षच अंधारात चाचपडत आहेत. 56 इंचाच्या जबरदस्त छातीचे निगर्वी, निर्भय, निःपक्ष, जागतिक स्तरावर विविध पुरस्कारांनी अलंकृत असे नरेंद्र दामोदरदास मोदी हे संपूर्ण भारत वर्षाला भयमुक्त करून सुरक्षित कवच प्रदान करून संपूर्ण विश्वासमोर ताठ मानेने उभा करायला निघाले आहेत, तर दुसरीकडे विचार, कार्यक्रम, दिशा यांचा सर्वस्वी अभाव असलेली 56 पक्षांची वेगवेगळ्या दिशांना तोंडे फिरवीत नरेंद्र मोदी कसे सत्तेवरून पायउतार होतील यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अमित शहा, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवेंपासून भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते प्रचाराची रणधुमाळी गाजवीत आहेत आणि मित्रपक्षांचे उद्धव ठाकरेंपासून रामविलास पासवान, रामदास आठवले, नितीशकुमार आदी नेते राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सभा गाजवीत आहेत.

देश विकसित व्हावा, देशातले शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, महिला, आदिवासी आदी समाजातील सर्व घटकांसाठी चांगले दिवस यावेत, सुखी-समृद्ध जीवन जगता यावे, समस्या कमी व्हाव्यात यासाठी  राष्ट्रीय लोकशाही आघाडीतले भारतीय जनता पक्ष, शिवसेना, अकाली दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष, जनता दल (संयुक्त), लोकजनशक्ती आदी मित्रपक्ष झटत आहेत, परिश्रम घेत आहेत. ऐन उन्हाळ्यात निवडणुकीचे वातावरण तापत असून प्रचार शिगेला पोहोचत असताना काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या प्रचाराचा दर्जा दिवसेंदिवस घसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका बाजूला ‘नफरतसे नहीं प्रेम से जितेंगे’ अशी बेंबीच्या देठापासून हाळी ठोकायची आणि दुसर्‍या बाजूला आपल्याच या वक्तव्याला हरताळ फासायचा ही ऐतिहासिक, शंभर वर्षांची परंपरा सांगणार्‍या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची कृती ही अत्यंत संतापजनक सार्‍या देशाने पाहिली. एका बाजूला संस्कृतीचे गोडवे गाताना, हीन संस्कृतीचे दर्शन घडवायचं. मुळात मला असं वाटतं की हिंदी भाषा आणि त्या भाषेतले शब्दांचे वाक्यांचे अर्थ या राष्ट्रीय अध्यक्षांना समजावून सांगण्याची गरज आहे. कारण संस्कृतीच्या गप्पा मारणारे राहुल गांधी नरेंद्र मोदींबाबत एका बाजूला मी मोदींवर प्रेम करतो असे सांगतानाच लालकृष्ण अडवाणी यांच्या संदर्भात मोदींबद्दल जे वाक्य भर सभेत राहुल गांधी बोलले त्यामुळे त्यांना जर वाटत असेल की अशा भाषणांमुळे पंजासमोरची बटणं जास्त दाबली जाऊन भरभरून मतं मिळतील तर तो त्यांचा निव्वळ भ्रम आहे, गैरसमज आहे. ही अशी वक्तव्य करण्याची आपल्या भारताची, हजारो वर्षांची सर्वोच्च परंपरा सांगणार्‍या देशाची परंपरा निश्चित नाही.

राजकारणातून 60 वर्षे पूर्ण करणार्‍या नेत्यांनी दूर व्हावे, हे वाक्य राहुल गांधी यांनी वापरून काय मातोश्री सोनिया गांधी यांना इशारा दिला की काय? मोतीलाल व्होरा बिच्चारे इतके वाकले आहेत की ते सोनिया-राहुल यांच्या पाठीमागे बॅग घेऊन चालताना राहुल गांधींना आनंद वाटतो काय? ‘मी सांगू लोकांना आणि ुुु माझ्या नाकाला!’ ही एक म्हण इथे तंतोतंत लागू पडते. कामराज नावाचे एक ज्येष्ठ नेते काँगे्रसमध्ये होऊन गेले. त्यांच्या नावाने एक कामराज योजना त्या काळात इंदिराजींच्या काळात पुढे आली होती. या योजनेतच 60 वर्षानंतर राजकारणातून निवृत्ती घ्यावी हे अंतर्भूत होतं, पण मुळातच असुरी महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या काँग्रेसच्या गांधी-नेहरू परिवाराला कोण समजावून सांगणार?

मनमोहन सिंह कितव्या वर्षी पंतप्रधान झाले. सीताराम केसरी यांच्यापासून मल्लिकार्जुन खर्गे किती वयाचे आहेत? अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांची वये काय आहेत? कामराज, निजलिंगप्पा आदींनी लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर ‘यशवंतराव चव्हाण विल बी दि नेक्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया (यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे भारताचे आगामी पंतप्रधान असतील)’ असा ठराव केला होता, पण विनम्र आणि सुसंस्कृत अशा यशवंतराव चव्हाण यांनी, ज्यांचे बोट धरून मी नवी दिल्लीला आलोय त्या पंडितजींच्या वारस इंदिराजी आहेत, मी त्यांची परवानगी घेऊन पंतप्रधान बनू शकेल, असे उत्तर दिले. इंदिरा गांधी यांना यशवंतराव चव्हाण यांनी कामराज यांच्या ठरावाची कल्पना देत त्यांचा निर्णय काय? असे विचारले. एका तासाने मी उत्तर देईन, असे सांगणार्‍या इंदिरा गांधी यांनी एका तासांत, विथ दी हेल्प ऑफ यशवंतराव चव्हाण, आय विल बी प्राईम मिनिस्टर (यशवंतराव चव्हाण यांच्या सहकार्याने मी भारताची पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारीन) असा निर्णय दिला. महाराष्ट्राचा हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला, पण अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि धूर्त राजकारणी अशा इंदिरा गांधींमुळे हा आपला मराठा गडी दिल्लीच्या तख्तावर बसू शकला नाही आणि लाल किल्ल्यावरून भाषण देण्याचे त्यांचे स्वप्न अर्ध्यावरच राहिले. गांधी-नेहरू परिवाराने देशातल्या समग्र यशवंतराव चव्हाणांपासून अनंत गाडगीळांपर्यंत महाराष्ट्राच्या सार्‍या नेत्यांना निव्वळ वापरून घेतले, पण सत्तेची सर्वोच्च फळे मात्र स्वतःच्या पदरात पाडून घेतली. आता राहुल गांधींची एकेक भाषणे ऐकल्यानंतर आणि त्यांचा अविर्भाव पाहिल्यानंतर एखाद्या माध्यमिक शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धेतला विद्यार्थी तरी सुसंस्कृतपणे भाषण देऊ शकेल असे वाटते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने गळा काढणार्‍या काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वापासून खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत ज्यांची पात्रता नाही असे लोक घटनेनुसार वैधानिक पदांवर बसलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा पावलोपावली जो खालच्या पातळीवर जाऊन अपमान करीत आहेत ते पाहता प्रचार शिगेला आणि प्रचाराचा दर्जा घसरला, असेच म्हणावे लागेल. जाहीरनामा काढताना 55 वर्षे देशावर राज्य करणार्‍या पक्षाला तीच तीच आश्वासने देताना लाज कशी वाटत नाही. उलट कर्तव्यदक्ष आणि विकासाची गंगा दारोदारी पोहोचणार्‍या भगीरथाची लाज काढताना शरम कशी वाटत नाही? भ्रष्टाचाराने आकंठ बुडालेले लोक भ्रष्टाचाराविरुद्ध बोलतात तेव्हा तर यांची कीव करावीशी वाटते. बुडत्या जहाजातून सारे निघून जाताहेत, इतस्ततः जाताहेत, नाकातोंडात पाणी जातंय तरी सत्तेची स्वप्न पाहण्याचे अजून थांबत नाहीत. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना दिली, पण त्यांचे वारसदार म्हणवणारे वंचितांना सत्ता प्राप्त करून देणार्‍या गर्जना करताहेत, पण त्यासाठी जी वाक्ये ते वापरताहेत हे पाहता यांना वाट्टेल ते बोलण्याचा परवानाच मिळाला आहे की काय? असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतोय. एक बरे झाले की वंचित बहुजन आघाडी स्थापन करून प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेवर नेऊन बसविण्याचा आणि काँग्रेस महाआघाडीला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा एक चांगलाच आराखडा बनवला असल्याचे दिसून येते.

बोलायला तोंड दिले म्हणून वाट्टेल ते बोलायचे आणि आपले स्वतःचे हसे करून घ्यायचे हीच तर्‍हा ऐतिहासिक वारसा सांगणार्‍यांची झाली आहे. भाईंदरच्या केशवसृष्टीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून बोलघेवड्यांपर्यंत नेत्यांना प्रशिक्षण देण्याची गरज वाटते. खरे नां? रविशंकर प्रसाद, डॉ. मनोहर जोशी, संमित पात्रा, विनय सहस्त्रबुद्धेंपासून माधवराव भंडारी यांच्यापर्यंत सारे नेते चांगले प्रशिक्षण काँग्रेसवाल्यांना देऊ शकतील.

मी तर म्हणतो की, राहुल गांधी यांनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात आणि आता सुरू आहेत तशीच भाषणे राणा भीमदेवी थाटाने करावीत. 23 मे 2019 नंतर 2014च्या निवडणुकांत जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तेवढ्या, पण जागा मिळणे काँग्रेसला मुश्कील होईल आणि मोदींचा पुन्हा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा होईल. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचे वाक्य आठवते, ‘2019 नही, 2024 की तैयारी करो!’ पण राहुलच्या अशा नेतृत्वामुळे 2024च काय यापुढेही कठीण आहे आणि महात्मा गांधी यांचे स्वप्न, इच्छा पूर्ण होईल!

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply