सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर
उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींसाठी सन 2020 ते 2025 या कालावधीकरिता सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तू नवले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता उरण एजुकेशन हायस्कूल, बोरी पालक मैदान उरण येथे हा कार्यक्रम झाला. 2011 च्या जनगणनेचा विचार करून हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
हे आरक्षण जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उरण तालुक्यासाठी निश्चित करून दिले आहे. यामधील पदे अनुसूचित जातीसाठी एक (महिला), अनुसूचित जमाती तीन त्यात खुला एक व महिला दोन, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण नऊ त्यात पाच खुला व चार महिला, सर्व साधारण एकूण 22 त्यापैकी 11 महिला असे आहे.
या आरक्षण सोडतीत महिला आणि पुरुष यांना समसमान संधी मिळाली आहे. अनुसूचित जाती (महिला आरक्षण) नागाव ग्रामपंचायत; अनुसूचित जमाती (महिला आरक्षण) हनुमान कोळीवाडा व वेश्वी ग्रामपंचायत, अनुसूचित जमाती (खुला) पुनाडे ग्रामपंचायत; नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) करळ, नवघर, धुतुम व नवीन शेवा; नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला) चिरनेर, डोंगरी, दिघोडे, पाणजे, चाणजे; सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण (सर्वसाधारण महिला) पिरकोन, वशेणी, जसखार, घारापुरी, आवरे, कोप्रोली, रानसई, सोनारी, भेंडखळ, म्हातवली, कळंबूसरे; सर्व साधारण (अनारक्षित) केगाव, चिर्ले, विंधणे, सारडे, फुंडे, बोकडवीरा, पागोटे, जासई, बांधपाडा, गोवठणे, जुई या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अशी माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
या वेळी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, नायब तहसीलदार नरेश पेढवी, तहसील कार्यालयातील कर्मचारी, सर्व ग्रामपंचायतीतील सदस्य व नागरिक उपस्थित होते.