नियमांचे उल्लंघन करणार्या दुकानदारांना दणका
पेण ः प्रतिनिधी
येथील नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने धडक कारवाई करीत शहरातील 11नंतर उघड्या असणार्या दुकानदारांवर 10 हजार रुपये दंड व कोविड काळ संपेपर्यंत दुकान सील अशी कारवाई केली, तसेच दुकानात आढळलेल्या ग्राहकांकडूनही 500 रुपयेप्रमाणे दंडवसुली करण्यात आली आहे.
कोरोनाच्या महामारीने जगावर संकट आले असून, दुसर्या लाटेने राज्यात हाहाकार माजला आहे. रायगड जिल्ह्यातही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी दुकाने केवळ सकाळी 7 ते 11पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यानंतरही काही दुकाने उघडी राहत आहेत. विनाकारण फिरणार्यांची संख्याही वाढलेली दिसत होती. त्यामुळे पेण पालिकेने धडक कारवाई सुरू केली.
या कारवाईत 19 दुकानदारांवर 10 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ही दुकाने कोरोना काळ संपेपर्यंत सील करण्यात आली आहेत, तसेच या दुकानांत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांवरही 500 रुपयेप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख महेश वडके, प्रसन्न पाटील आणि पालिकेचे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. या धडक कारवाईमुळे नियमांचा भंग करणार्यांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे.