
पनवेल, कळंबोली : प्रतिनिधी
शहरी पट्टा, गावे असोत की सिडको वसाहती पनवेल महापालिका आपल्या हद्दीतील सगळ्या भागांसाठी कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ, सबका विकास हा मंत्र घेऊनच भारतीय जनता पक्ष पनवेल महापालिकेत काम करीत असल्याचे प्रतिपादन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोडपाली येथे केले. ते उद्यान लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
रोडपाली सेक्टर 20 मधील उद्यानाचे लोकार्पण गुरुवारी (दि. 21) सांयकाळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेवक अनिल भगत, अमर पाटील, नगरसेविका प्रमिला पाटील, भाजप कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, महिला अध्यक्ष निकम, युवा मोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर, आरआरडब्ल्यूएचे दिलीप जोशी आदी उपस्थित होते
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, सिडकोकडून कामाचा पाठपुरावा करताना होणारा विलंब टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन आपल्या अधिकाराचे व हक्काचे निर्णय पूर्ण करून घेता यावे याकरिता हक्काचे माध्यम म्हणून पनवेल महापालिकेची मागणी आपण तत्कालीन मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आज महापालिकेच्या माध्यमातून आपण विकासाचे एक एक पाऊल पुढे टाकीत आहोत. सार्वजनिक सुविधा जितक्या जास्त असतील तितका लोकांना जास्त आनंद मिळतो. आमदार ठाकूर यांनी ऑगस्ट 2019मध्ये आपण या कामाचे भूमिपूजन केले होते. सिडकोने लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे अशी आपली अपेक्षा होती असे सांगून, सिडकोने उद्यानाचे काम करताना येथील हिरवळ, संरक्षक भिंतीची रंगरंगोटी किंवा प्लास्टर याबाबत कोणतीही काळजी न घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हे उद्यान आता महापालिकेने ताब्यात घेतल्याने त्याचे काम करून घ्यावे आणि सिडकोला त्यांनी ताब्यात देताना असलेली परिस्थिती आणि काम करून घेतल्यानंतरचे फोटो पाठवून पत्र द्यावे म्हणजे सिडकोच्या अधिकार्यांपर्यंत ते पोहचेल असे सांगून, त्यांनी नागरिकांना कोरोना अजून संपला नसल्याने उद्यानाचा वापर करताना आपली काळजी घेण्याचे आवाहन केले
आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वप्न मनपाच्या माध्यमातून पूर्ण : महापौर
महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सांगितले की, रोडपालीमधील विकासाची कामे करण्यासाठी येथून निवडून आलेल्या नगरसेवकांनी केलेला पाठपुरावा महत्त्वाचा आहे. पनवेल महापालिका होण्यापूर्वी येथील गावांचा विकास झालेला नव्हता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या गावांच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. ते महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण झालेले आज आपल्याला पहायला मिळत आहे. आमदारांनी सिडकोचे अध्यक्ष असताना कळंबोलीचा हा प्लॉट उद्यानासाठी हस्तांतरित करून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आज हे उद्यान पूर्ण होऊन येथील खेळण्यांचा वापर करण्यास मिळणार म्हणून लहान मुलांच्या चेहर्यावर पसरलेला आनंद आपल्याला समोर दिसत आहे.
आमदार प्रशांत ठाकूर सिडको अध्यक्ष असताना त्यांनी 95 लाखांची निधी कळंबोली सेक्टर 20 मधील उद्यानासाठी दिला होता. येथे 25 बेंच, 450 मीटर जॉगिंग ट्रॅक व मुलांसाठी खेळणी आहेत. या उद्यानाचे काम पूर्ण केल्याबद्दल मी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानतो. महापालिकेने येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व ग्रंथालयही सुरू करावे.
-अमर पाटील, नगरसेवक