बेलापूर : रामप्रहर वृत्त : सीबीडीतील कोकण भवन येथे आपत्कालीन सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या अग्निरोधक यंत्रणेची मुदत जानेवारी महिन्यातच संपली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
राज्य शासनाच्या विविध सुमारे 72 विभागाची कार्यालये असलेल्या सीबीडी येथील कोकण भवनला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. या इमारतीमध्ये कोकण आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुप्तचर विभाग, माहिती उपसंचालक, विक्र ीकर, महसूल खाते, जातपडताळणी, आयुक्तालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास विभाग, निवडणूक विभाग, पोस्ट ऑफिस, दुय्यम निबंधक कार्यालय आदी कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी काम करीत असून विविध कामानिमित्त दररोज शेकडो नागरिक ये-जा करतात. सुरक्षेच्या दृष्टीने या इमारतीच्या आतील बाजूला प्रत्येक मजल्यावर विविध सुमारे 285 ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आली आहे. या अग्निरोधक यंत्रणेची दरवर्षी तपासणी करणे आवश्यक असते. कोकण भवन इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या अग्निरोधक यंत्रणेची मुदत 14 जानेवारी 2019 रोजी संपलेली आहे; परंतु या यंत्रणेच्या तपासणीकडे दुर्लक्ष झाल्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
अद्ययावत यंत्रणेचा समावेश होणार
कोकण भवनमधील अग्निरोधक यंत्रणा जुनी झाली आहे, या यंत्रणेची तपासणी करण्यात यावी, तसेच शक्य असल्यास यंत्रणेचे नुतनीकरण करण्यात यावे, असा प्रस्ताव सार्वजनिक विभागाला पाठविण्यात आला आहे, तसेच अग्निरोधक यंत्रणा हाताळणे थोडे कठीण असल्याने या अग्निरोधक यंत्रणेसोबत अद्ययावत फायर बॉल यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कोकण भवनमध्ये अत्याधुनिक फायर बॉल यंत्रणा बसविण्यात येणार आहे.