मान्यवरांसह नागरिकांनी मारला यथेच्छ ताव
पेण : प्रतिनिधी
राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाला असून, पेणमधील पशूसंवर्धन विभागाच्या केंद्रातील कोंबड्यांसुद्धा बर्ड फ्लूची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शासनाने आजूबाजूची चिकनची दुकाने बंद केली असल्याने नागरिकांमध्ये चिकन खाण्याबद्दल भीती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे पोल्ट्री व्यवसायिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या वतीने पेणमध्ये चिकन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत महोत्सवाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
या फेस्टिवलला पशुसवंर्धन उपायुक्त डॉ. म्हस्के, पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे, जि. प.चे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बंकट आर्ले, उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने, सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव, रायगड शेतकरी योध्दा कुक्कुटपालन सहकारी संस्थाचे अध्यक्ष अनिल खामकर, उपाध्यक्ष विलास साळवी, खजिनदार मनोज दासगावकर, सचिव दीपक पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी पशुसवंर्धन उपायुक्त डॉ. म्हस्के यांनी चिकन विशिष्ट तापमानात चांगल्या प्रकारे शिजवून खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचा रोग होत नसल्याचे स्पष्ट करून जनतेने चिकन फेस्टिव्हलचा आस्वाद घ्यावा, असे सांगितले, तर कुक्कुटपालन संस्थेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी सांगितले की, एखादा रोग पक्ष्यांना झाला तर त्याचा परिमाण लगेच चिकन व्यवसायावर होत असल्याची व्यथा मांडली. ग्रामीण भागात गावठी किंवा इतर जातीच्या कोंबड्यांवर रोग नेहमी येत असतात, परंतु लोकांच्या मनातील चिकन खाण्याबद्दल जी भीती निर्माण झाली आहे ती दूर करण्यासाठी या मोफत चिकन महोत्सवाचे आयोजन केले असल्याचेही ते म्हणाले.
या महोत्सवात चिकन लॉलीपॉप, चिकन टिक्का, चिकन बिर्याणी यांसारखे पदार्थ बनविण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांबरोबरच नागरिकांनी चिकनवर यथेच्छ ताव मारीत हा फेस्टीवल यशस्वी केला.