राज ठाकरेंच्या भेटीनंतर आमदार प्रसाद लाड यांचे सूचक विधान
मुंबई : प्रतिनिधी
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी (दि. 23) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. यानंतर आमदार लाड यांनी माध्यमांशी संवाद साधत मुंबई महानगरपालिकेत भाजपचच महापौर बसेल, असा विश्वास व्यक्त केला.
‘भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत ताकदीने लढणार हे निश्चित आहे. भाजपचा झेंडा महापालिकेवर फडकणार हा निश्चय केला आहे. शिवसेनेची परंपरागत असलेली सत्ता आम्ही काढून घेणार आहोत. त्याच्यासाठी जे लोकं आमच्यासोबत येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. मनसेसोबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आजची भेट ही केवळ वैयक्तिक आणि मैत्रीची भेट होती. राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळेच त्यांची भेट घेतली,’ असे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.
आमदार लाड पुढे म्हणाले की, मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल आणि महापालिकेत आमचा महापौर बसेल हे मी आत्मविश्वासाने सांगत आहे. अद्याप महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. जी काही गणिते आहेत ती महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यावरच होत असतात. त्यामुळे मी योग्य वेळी योग्य उत्तर देईन.
कांजुरमार्गचा बालहट्ट सोडावा
या वेळी आमदार लाड यांनी मेट्रो-3च्या कारशेडवरुन सुरू असलेल्या वादावरही भाष्य केले. कांजुरमार्गच्या जागेच्या बाबतीत यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने ही केंद्र सरकारची जागा असल्याचे सांगितले आहे. केंद्रानेही त्यावर आक्षेप नोंदवला आहे. केवळ बालहट्टापायी हा निर्णय सतत समितीच्या माध्यमातून, मुख्य सचिवांच्या माध्यमातून लादण्याच्या प्रयत्न केला जातोय. मुंबईच्या जनतेवर अन्याय करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने बालहट्ट सोडावा. गोरेगावच्या जागेला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. यामुळे सरकारचे पाच हजार कोटी रुपये वाचणार आहेत. याचा निर्णय सरकारने घ्यायला हवा. जनेतेचे हाल होण्यापासून थांबवले पाहिजे. जे मेट्रोचे काम एक वर्ष पुढे ढकलले गेलेय ते लवकर पूर्ण करून मुंबईच्या जनतेला न्याय द्यायला हवा, असे लाड यांनी नमूद केले.