आयुक्तांचे आदेश; 27 जानेवारीपूसन 5 ते 12 वीपर्यंतचे भरणार वर्ग
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रातील 5 ते 12 वीचे वर्ग असलेल्या सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या सर्व शाळा व विद्यालये सुरू करण्यात याव्यात, असे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. शुक्रवारी (दि. 22) आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या स्वाक्षरीने या संदर्भातील आदेश जारी करण्यात आले. शाळा सुरू करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेण्याच्या सुचना या वेळी देण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार 15 जून 2020 पासून शैक्षणिक वर्ष सुरू करून स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा टप्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबु नये यासाठी राज्य शासनाने इयत्ता 9 ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली याआधी काढलेल्या परिपत्रकाद्वारे दिली होती. तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 5 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग दिनांक 27 जानेवारी 2021 पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांचे पालन करून पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचे वर्ग असलेल्या सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरक्षितपणे सुरू करण्यात याव्या. याबाबतचे आदेश पत्रकाद्वारे पनवेल महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
कोविडच्या नियमांचे पालन बंधनकारक
कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी शासन व पनवेल महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करणे सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा व विद्यालयांना बंधनकारक राहील. मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करणार्यावर कारवाई करण्यात येईल.