Breaking News

अर्बन हाट येथील हिवाळी महोत्सव 26 जानेवारीपर्यंत सुरू

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

अर्बन हाट येथे सुरू असलेला हिवाळी महोत्सव (विंटर फेस्टिव्हल) आता 26 जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून, या महोत्सवांतर्गत फुड फेस्टिव्हलही आयोजित करण्यात येणार आहे.

23 ते 26 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात येणार्‍या फुड फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्र, केरळ, पंजाब असे विविध प्रांतांतील खाद्यपदार्थ तसेच कोल्हापुरी मांसाहारी पदार्थ खवय्यांच्या रसनातृप्तीसाठी सज्ज असणार आहेत. सर्व पदार्थ हे घरगुती असून स्वछतेची काळजी घेऊन बनविण्यात येणार आहेत.

या महोत्सवामध्ये अथर्वची लिनन उत्पादने, कृत्रिम दागिने, स्त्रियांसाठी कुर्ते आणि साड्या, डिझायनर ब्लाऊज, ट्रायबल आणि स्टोन ज्वेलरी, जयपूर ज्वेलरी, जर्मन सिल्व्हर ज्वेलरी, बनारसी व रेशमी साड्या, ड्रेस मटेरिअल, पुरुषांसाठी खादीचे कुर्ते, ब्लॉक प्रिंटिंग बेडशीट, वारली, मधुबनी अशा विविध शैलींतील चित्रे, डोअर मॅट, जैविक खाद्य उत्पादने, लोणची, पापड, मसाले अशी विविध उत्पादने प्रदर्शनार्थ आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट कारागिरांकडून ही उत्पादने विकली जात आहेत. 500 ते 1500 रुपये श्रेणीतील वस्त्रप्रावरणेही उपलब्ध आहेत. तसेच 24 जानेवारीला हॅपी सिंगर ग्रुपतर्फे सायंकाळी 5 ते 9 या वेळेत गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.  

अर्बन हाट परिसर स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण असेल याची आयोजकांतर्फे पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. स्टॉल आकाराने मोठे असल्याने सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे शक्य होणार आहे. अर्बन हाटला भेट द्यायला येणार्‍यांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.

महोत्सवात सॅनिटायझर किंवा हॅन्डवॉशने निर्जुंतुकीकरण केल्यानंतरच आतमध्ये प्रवेश देण्यात येईल. अर्बन हाटला भेट द्यायला येणार्‍या पर्यटकांनी आपल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना आणून नये तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.

हिवाळी महोत्सवाकरिता 270 रुपये प्रती दिन या दराने स्टॉल उपलब्ध आहेत. गृहिणींना स्वनिर्मित उत्पादनांची विक्री करून अर्थार्जन करण्यासाठी ही उत्तम संधी आहे. स्टॉल बुकिंगसाठी व्यवस्थापक, अर्बन हाट यांच्याशी 9594521169 या क्रमांकावर संपर्क साधावा. हिवाळी महोत्सवानंतर 4 ते 14 जानेवारी या कालावधीत वसंत मेळा, 18 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत हातमाग महोत्सव व त्यानंतर जून 2021 पर्यंत विविध महोत्सव अर्बन हाट येथे आयोजित करण्यात येणार आहेत.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply