कोळीवाड्यातील मतदारांकडून ढोल ताशांचा निनाद, फुलांची उधळण
पनवेल : रामप्रहर वृत्त-
भाजप, शिवसेना महायुतीचा विजय असो, खासदार बारणे यांचा विजय असो अशा जयघोषात निघालेल्या भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या प्रचार रॅलीला गुरुवारी पनवेल कोळीवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रचाराने महायुतीने जोरदार मुसंडी घेतल्याचे दिसून आले. आमदार प्रशांत ठाकूर, मनपा सभागृह नेते परेश ठाकूर आणि शिवसेना युवा नेते विश्वजीत बारणे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचार रॅली काढून मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. या रॅलीत मनपातील भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी यांच्यासह दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झालेले होते. मतदारसंघात राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्ही मतदारांपुढे जात असून, खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा लोकसभेवर पाठविण्याचा निर्धारही आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.