Breaking News

जुन्या उद्यानांची दुरवस्था

शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात

धाटाव ः प्रतिनिधी 

एकीकडे रोहा तालुक्याचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत आहे, मात्र तेवढ्याच पटीने जुन्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी नवीन अभिमानास्पद अशी उद्याने बांधण्याचे काम सुरू आहे, तर दुसरीकडे कोलाड येथे शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्ज असे पाटबंधारे विभागाच्या अधिपत्याखाली उद्यान बांधण्यात आले होते, परंतु या उद्यानाची आताची दयनीय अवस्था पाहून शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचे पाहायला मिळत आहे. याचा वापर केवळ दारूचा अड्डा म्हणूनच दिसून येत आहे.

कोलाड येथे नाना नानी पार्कची देखभाल व दुरुस्ती केली जात नाही. या गार्डनचे गेटसुद्धा व्यवस्थित नाही. संरक्षक भिती कोसळलेल्या आहेत. आतमधील दिवे खराब असल्याने लाइटची सोय नाही. सर्वत्र गवताचे साम्राज्य दिसत आहे. येथील सुंदर झाडांची व्यवस्थित देखभाल केली जात नाही. उद्यान ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी बांधले असताना येथे सुविधांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे पाटबंधारे विभाग जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.

एकीकडे रोहा तालुक्याचे गतवैभव वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपयांची नवनवीन उद्याने बनविली जात आहेत, परंतु जुन्या उद्यानांची देखभाल केली जात नाही. त्यामुळे कोट्यवधींची कामे केली जातात, मात्र जोपासली जात नाहीत.

कोलाड येथील नाना नानी पार्कची झालेली दुरवस्था बघून शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात न घालवता लोकप्रतिनिधी व शासनाने याकडे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply