कोर्लई जमीन प्रकरण; 28 जानेवारीला दिल्लीत सुनावणी
मुरूड ः प्रतिनिधी
विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे असलेल्या कोर्लई येथील जागेची माहिती प्रतिज्ञापत्रात न दाखवल्यामुळे निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि. 28) दिल्ली येथे केंद्रीय आयोगासमोर अर्जाची सुनावणी होणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी मुरूड येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
सोमय्या यांनी मुरूड येथील तहसीलदार कार्यालयात सोमवारी नायब तसीलदार रवींद्र सानप यांची भेट घेऊन कोर्लई येथील 19 बंगल्यांना सुरक्षा पुरवावी यासाठी लेखी निवेदन दिले. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मी आज जिल्हा पोलीस अधीक्षक व मुरूड तसीलदारांकडे कोर्लई येथील जागेत जे 19 बंगले आहेत, त्यांना संरक्षण देण्याची मागणी केली. कारण या बंगल्यांत सर्व महत्त्वाची कागदपत्रे आहेत. कोर्लई येथील जागा व बंगले यांची शासकीय किंमत 11 कोटी असताना ती जागा फक्त दोन कोटी 10 लाख रुपयांत खरेदी केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी मनी लॉन्डरिंग केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. या प्रकरणाची केंद्रीय कायदा मंत्री तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीसंदर्भात 28 जानेवारीला सुनावणी होणार आहे. सुनावणीसाठी आवश्य असलेली माहिती तसेच महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित रहावीत यासाठी तहसीलदारांची भेट घेतली. तसेच ज्या ज्या वेळी शासकीय चौकशीला महत्त्वाची कागदपत्रे लागतात, तेव्हा त्या विभागात आग लागून सदरची कागदपत्रे नष्ट केली जातात. त्यानंतर शॉर्टसर्किट होऊन आग लागून कागदपत्रे नष्ट झाल्याचा अहवाल येतो. अशा घटना मंत्रालयातसुद्धा घडल्या आहेत. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दक्षता घेण्यासाठी हा विशेष दौरा केल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी डॉ. किरीट सोमय्या यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष महेश मानकर, शहर अध्यक्ष उमेश माळी, मुरूड शहर संघटक प्रवीण बैकर, अभिजित पानवलकर, जयवंत अंबाजी, शैलेश काते, आण्णा कंधारे, बाळा भगत, जितेंद्र शेडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.