भाजपचे वैकुंठ पाटील यांचे प्रतिपादन
पेण ः प्रतिनिधी
पेण पूर्व विभागाचा विकास करण्यात शेकाप पूर्णपणे अपयशी ठरला आहे, मात्र भाजप आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप या विभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व भाजपचे युवा नेते वैकुंठ पाटील यांनी शेडाशी येथे केले. आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून शेडाशी ग्रामपंचायतीत खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि. 24) करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास भाजप पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत म्हात्रे, कामगार नेते विनोद शहा, प्रसाद वेदक, शेडाशी ग्रामपंचायत सरपंच प्रकाश कदम, उपसरपंच भरत जाधव, ग्रामसेवक विशाल पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस महेश भिकावले यांच्यासह मायणी, तळदेव, शेंडाशी, ढेणे येथील ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी भाजप युवा नेते वैकुंठ पाटील म्हणाले की, पेण तालुक्यात गेली अनेक वर्षे पूर्व विभागात कोणताही विकास झाला नव्हता. तो आता भाजपच्या कार्यकाळात झाला आहे. शेडाशी ग्रामपंचायत 25 वर्षे शेकापच्या ताब्यात असताना येथील विकास खुंटला होता. रविशेठ पाटील यांनी 2009मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना शेडाशी ग्रामपंचायतीमधील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला होता. आज या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे. कोरोना काळामुळे राज्य शासनाकडून विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत नाही. हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असल्यामुळे त्यांनी अडवून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावर मात करून हा रस्ता केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम ही काळाची गरज असल्याने ग्रामस्थांनी या खुल्या व्यायामशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, पेण मतदारसंघाच्या विकासकामांसाठी एमएमआरडीए अंतर्गत प्राप्त झालेला नऊ कोटी रुपयांचा निधी रायगड जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने अडवून ठेवल्याचा आरोपदेखील वैकुंठ पाटील यांनी या वेळी केला. भाजपचे कामगार आघाडी कोकण विभागाचे अध्यक्ष विनोद शहा यांनी या खुल्या व्यायामशाळेसाठी स्वखर्चाने लादी लावून देणार असल्याची घोषणा या वेळी केली.