पनवेल : वार्ताहर
कामोठे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पान टपरी व इतर दुकानांमध्ये बेकायदेशीररित्या प्रतिबंधित तंबाखू व सुगंधी पान मसाल्याची विक्री करण्यात येत होती. यांच्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने तसेच कामोठे पोलीस ठाण्याने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात विक्रीस बंदी असलेला माल हस्तगत केला आहे.
महाराष्ट्रात प्रतिबंधित तंबाखू व सुगंधी पान मसाल्याची विक्री करण्यास बंदी असतानाही छुप्या मार्गाने हा माल इतर राज्यातून आणून कामोठे वसाहतीत अनेक पान टपरी व इतर दुकानांमध्ये त्याची सर्रास विक्री केली जात होती. याबाबतच्या अनेक तक्रारी स्थानिक रहिवाशांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केल्या होत्या.
या तक्रारीनंतर कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने वसाहतीमधील वेगवेगळ्या दुकानांवर धडक कारवाई केली. कारवाईत जवळपास 57, 75, 50 हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत करून त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारे बेकायदेशीररित्या छुप्या मार्गाने विक्री करणार्याचे धाबे दणाणले आहेत.