अलिबाग : प्रतिनिधी
आपल्या अवैध रेती व्यवसायाबाबत तक्रारी करणार्याची बदनामी करण्याच्या हेतूने त्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून त्यावरून महिलेला अश्लील व्हिडीओ आणि मेसेजेस पाठवल्याप्रकरणी प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस अॅड. उमेश ठाकूर याला अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. उमेश ठाकूर रुग्णालयात दाखल असून त्याची मेडिकल कस्टडी घेण्यात आली आहे. अॅड. उमेश ठाकूर हे रेतीचा व्यवसाय करतात. धरमतर खाडीतील त्यांच्या अवैध रेती उत्खननासंदर्भात पेण तालुक्यातील कोलेटी येथील काशिनाथ ठाकूर वेगवेगळ्या कार्यालयात तक्रारी करत असत. त्यामुळे अॅड. ठाकूर यांना व्यवसायात मोठे नुकसान होत होते. आपल्या विरोधातील तक्रारीने अॅड. ठाकूर हैराण झाले होते. त्यांनी काशीनाथ ठाकूर यांचा काटा काढण्याचा बेत आखला. शुभम गुंजाळ यांच्या मदतीने काशीनाथ ठाकूर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले व आपल्याच ओळखीतील मनीषा चोरडेकर हिला त्यावरून अश्लील व्हिडीओ व मेसेजेस पाठवले. या व्हिडीओ आणि मेसेजच्या आधारे मनीषा चोरडेकर हिने काशीनाथ ठाकूर यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तपासीक अमलदार पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी सायबर सेलची मदत घेण्याचे ठरवले. सायबर सेलने केलेल्या तपासात शुभम गुंजाळ हा या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्याची सखोल चौकशी केली असता अॅड. उमेश ठाकूर हा या कटाचा सूत्रधार असल्याचे समोर आले. महत्त्वाचे म्हणजे ज्या महिलेने तक्रार दिली होती, ती मनीषा चोरडेकर या कटात सहभागी होती. अलिबाग पोलिसांनी अॅड. उमेश ठाकूर, शुभम गुंजाळ आणि मनीषा चोरडेकर या तिघांनाही अटक केली आहे. प्रकृती बिघडल्याच्या कारणावरून उमेश ठाकूर रुग्णालयात दाखल झाला आहे. त्याची मेडिकल कस्टडी घेण्यात आली आहे, तर उर्वरित दोघांना 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper