धाटाव : प्रतिनिधी
ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने रोहा पंचायत समिती कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यात प्रामुख्याने उत्पन्न व वसुलीची अट घालणारा 27 एप्रिल 2020चा शासन निर्णय रद्द करणे, किमान वेतन निर्णयाची अंमलबजावणी करणे, राहणीमान भत्ता कमी करणारा निर्णय रद्द करणे आदी मागण्यांचा समावेश आहे. त्या सोडवण्यासाठी संघटनेने अनेक प्रयत्न केले, परंतु शासनाने कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. त्यामुळे या प्रलंबित मागण्यांकरिता रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली 28 जानेवारी रोजी रोहा पंचायत समिती कार्यालयावर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. त्यात संघटनेचे रोहा तालुका अध्यक्ष सुरेश शिर्के, उपाध्यक्ष शत्रुघ्न कामतेकर, सचिव शंकर कदम, अरुण मोरे, गणेश मोरे, सहदेव बर्डे या पदाधिकार्यांसह अनेक सदस्य सहभागी झाले होते. त्यांनी गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकार्यांना आपल्या रखडलेल्या मागण्यांचे निवेदन दिले.