Breaking News

आंबेत पूल बुधवारपासून वाहतुकीसाठी बंद

अलिबाग, पोलादपूर : प्रतिनिधी

रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंबेत ते म्हाप्रळ दरम्यानचा सावित्री नदीवरील पूल येत्या 10 तारखेपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. महाडमधील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर आंबेत पूलाच्या क्षमतेचा आणि सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. 40 हून अधिक वर्षे जुना असलेला हा पूल कमकुवत आणि धोकादायक झाला आहे. त्यामुळे या पूलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शासनाने 10कोटी रूपये मंजूर केले होते. गेली दोन वर्षे हे काम सुरू आहे. आता ते अंतिम आणि महत्वाच्या टप्प्यात आहे. हे काम करताना पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवावा लागणार आहे. आंबेत पुल वाहतूकीसाठी बंद केल्यास कोकणातील मंडणगड, दापोली, वेळास, बाणकोट, मुरूड, आंजर्ले, दाभोळ यासारख्या भागात जाणार्‍या चाकरमान्यांना वळसा घालून जावे लागणार आहे.  शिवाय खाडी किनारी असलेल्या गावांचाही संबंध तुटणार आहे. त्यामुळे पर्यायी वाहतूक व्यवस्था केल्याशिवाय पूलावरील वाहतूक बंद करू नये, अशी स्थानिकांची मागणी होती. ही बाब लक्षात घेवून या ठिकाणी फेरीबोट म्हणजेच रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी दोन्ही बाजूला जेटी उभारण्यात आली आहे. आता या जलमार्गावर येत्या सोमवार (दि. 8) पासून रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपली वाहने घेवून या बोटीतून प्रवास करता येणार आहे.

सावित्री नदीवरील आंबेत पूलाची लांबी 376 मीटर आहे. या पूलाच्या दुरूस्तीसाठी शासनाकडून 10 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. पुलावर पॅडलस्टन आणि बेअरिंग बदलायचे काम केले जाईल, तेंव्हा पूल स्लॅब आणि गर्डरसह उचलावा लागणार आहे. त्यामुळे 10 फेब्रुवारीपासून हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

-एस. एस. उलागडे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

आंबेतचा पूल वाहतूकीसाठी बंद झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होवू नये, यासाठी आम्ही तेथेच 8 फेब्रुवारीपासून रो रो सेवा सुरू करीत आहोत. यातून प्रवाशांना ट्रक, टेम्पो, रिक्षा, बस, मोटारसायकल अशी वाहने घेवून प्रवास करता येणार आहे.

-डॉ. चंद्रकांत मोकल, सुवर्णदुर्ग शिपींग अ‍ॅन्ड मरीन सर्व्हीसेस

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply